BJP चा नागपूर, पुण्याचा विकास पहिल्या पावसातच रस्त्यावर; माजी क्रीडामंत्री सुनिल केदारांची टीका
By अजित घस्ते | Published: May 11, 2024 05:33 PM2024-05-11T17:33:14+5:302024-05-11T17:33:55+5:30
पुण्यात पाऊस पडल्यानंतर मी रस्त्याने फिरलो त्यावेळी पुण्याचा विकास कुठे आहे हे शोधू लागलो, असा उपरोधिक टोला माजी क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी लावला....
पुणे : देश भरात विकासाच्या नावे भाजपा मतदान मागत आहे. काल दीड तासाच्या पावसात पुण्यात रस्त्यांवर पाणीत पाणी पाहिले, महापौरांनी काय विकास केला आहे? पुण्यात ही आवस्था तर नागपुरात तर घरात पाणी शिरते असा विकास केला असेल तर जनतेकडे विकासाच्या नावे मत मागत आहे? पुण्यात पाऊस पडल्यानंतर मी रस्त्याने फिरलो त्यावेळी पुण्याचा विकास कुठे आहे हे शोधू लागलो, असा उपरोधिक टोला माजी क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी लावला.
पावसाळा सुरु झाल्यावर पुण्यातील रस्त्यांची ही अवस्था असेल तर कसला विकास केला. वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करणा-यांनी काय विकास केला. पुण्यातून वाहण्या-या नदीची काय अवस्था आहे. ही नदी आहे की काय आहे असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे विकासावर बोलणा-यांना पुणेकरांनी समाचार घेतलाच पाहीजे असे प्रखंड मत माजी क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केदार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, सुनील माने उपस्थित होते.
केदार म्हणाले, भाजप केरळमध्ये का वाढत नाही. शिक्षण असल्याने केरळात भाजप वाढत नाही. देशातील पहिले क्रीडा विद्यापीठसाठी मंजूरी मिळाली होती. मात्र या सरकारने गेले दोन वर्ष काहीच केले नाही. त्यामुळे भाजपाला पुणेकरांनी धडा शिकवावा. यावेळी सुनील माने म्हणाले की, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीची समस्या भेडसावत आहे. महापालिकेत समाविष्ठ केलेल्या गावांमध्ये पाणी व इतर सुविधा मिळत नसल्याचे भयानक वास्तव आहे. तर मागासर्गीयांचे ५५० कोटीचा निधी कोठे खर्च केला. तो कुठे पळवला याचा ही भाजापानी हिशोब द्यावा. भाजपा विकासाच्या नावे गप्पा मारू नये.