पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात जुन्या-नव्यांचा वाद आता प्रदेशच्या नेत्यांच्या कोेर्टात गेला आहे. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे एकेकाळचे पट्टशिष्य असलेले ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झाले. त्यामुळे भाजपचे राष्ट्रवादीकरण होण्याच्या भीतीने निष्ठावान व मूळ कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थ कार्यकर्त्यांनी या प्रकाराबाबत प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारीचा सूर आवळला आहे. महापालिका निवडणूक जवळ येत आहे, तसतशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ कायम आहे. अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता उलथून लावण्यासाठी भाजपाने वर्षभरापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपातील स्थानिक नेत्यांना ताकत देण्याच्या उद्देशाने अमर साबळे यांना खासदारकी आणि अॅड. सचिन पटवर्धन यांना लोकलेखा समितीचे प्रमुखपद दिले. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी नवी खेळी भाजपाने खेळली. शहराध्यक्षपदी अजित पवार यांचे एकेकाळचे खंद्दे पुरस्कर्ते आमदार लक्ष्मण जगताप यांची निवड केली. जगतापांमुळे भारतीय जनता पक्षाला बळ मिळाले. त्यांच्यासह तीन माजी स्थायी समिती सभापतीही भाजपात दाखल झाले. आणखी काही सदस्य दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीतील अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह नऊ नगरसेवक भाजपात दाखल झाले. त्यात राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांचा समावेश होता. त्यानंतर माजी महापौर आझम पानसरे हेही भाजपात दाखल झाले आहेत. अजित पवारांचे एकेकाळीचे पुरस्कर्ते एकामागून एक भाजपात दाखल झाल्याने जुन्या-नव्यांचा वाद आणि गटबाजी उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मूळचे मुंडे व गडकरी गटांसह शहराध्यक्ष, खासदार, भोसरीचे आमदार असे आणखी तीन गटांची भर पडली आहे. त्यामुळे पूर्वी जी गटबाजी राष्ट्रवादीमध्ये चालत होती. तोच प्रकार आता होऊ लागल्याने भाजपा कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. आयात नगरसेवकांना व कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याच्या भितीने निष्ठावान कार्यकर्त्यांना अस्तित्वाचा लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)उमेदवारांसाठी होणार गटबाजी उमेदवारांची सक्षमता पाहूनच (मनी, मसल) उमेदवारी देणार असल्याचे भाजपातील नेते सांगत आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना उमेदवारीसाठी कष्ट घ्यावे लागणार आहे. उमेदवारीत जुन्या सदस्यांना डावलू नये, निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, गटबाजीला थारा देऊ नये, अशी मागणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रदेशच्या नेत्यांकडे सुरू केली आहे.
आयारामांमुळे भाजपाचे होतेय ‘राष्ट्रवादी’करण
By admin | Published: January 13, 2017 3:10 AM