पुणे : भारतीय जनता पार्टीकडून पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी एकदम नवा व राजकारणाबाहेरचा चेहरा देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. धक्काशैलीचे राजकारण करणाऱ्या अमित शहा यांनीच पक्षाच्या प्रदेशस्तरावरील पदाधिकाऱ्यांना त्याबाबत कळवले असल्याची माहिती मिळाली. प्रदेशपातळीवरूनच याबाबत चाचपणी सुरू असून त्याची कुणकूण लागली असल्यामुळे स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये त्याची चर्चा सुरू आहे.काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघावर भाजपाने आतापर्यंत दोन वेळा बाजी मारली आहे. पण ते दोन्ही उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आले नाहीत व मतदारसंघही हातातून गेला. सन २०१४ मध्ये पुन्हा हा मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने भाजपाकडे आला. आता तो कायम रहावा यासाठी पुर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजपाचा उमेदवार दुसऱ्यांदा येत नाही हा इतिहास असेल तर दुसरा उमेदवार देऊन मतदारसंघ कायम ठेवायचा या विचारातूनच पक्षाबाहेरच्या पण प्रभावी असणाऱ्या उमेदवाराबाबत विचार करण्यात येत आहे.विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट हेही पुणे शहरातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. दोघांचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोघांनाही पक्षाच्या दिल्लीस्तरावरील नेत्यांबरोबर भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. शिरोळे यांनी मागील पाच वर्षात पक्षात वरिष्ठ वतुर्ळावर चांगले संबध प्रस्थापित केले आहेत. बापट यांची भिस्त स्थानिक व राज्यानंतर आता राष्ट्रीय राजकारणात येण्याची इच्छा यावर आहे. मात्र, पक्षात गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेल्या या हालचालींमुळे या दोन्ही उमेदवारांच्या प्रयत्नांना मर्यादा पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.