लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढी वारीतील वारकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या ताडपत्री खरेदीत गफला केल्याचा भाजपावर आरोप झाला. भाजपाच्या कार्यशैलीचा मुद्दा चर्चेत असताना, महापौरांच्या वाहनाच्या मुद्द्याने त्यांच्यात वाद झाला. त्यातच नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांना गणवेश खरेदी करण्याबाबतच्या मुद्द्यावर सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्षा यांच्यात काहीच ताळमेळ नसल्याचे उघड झाले आहे. बाजारात दोन हजार चारशे रुपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा गवगवा करणाऱ्या भाजपाने जादा दराने (तीन हजार ४१२ रुपये) खरेदी केली आहे. वाढीव दरानुसार २२ लाख १७ हजार ८०० रुपये खर्च अपेक्षित होता. सुमारे सहा लाख साठ हजारांचा गफला झाल्याचा आरोप झाला होता. त्याचा खुलासा करताना, २५ लाखांच्या आतील खरेदी असल्यामुळे पालिका आयुक्तांच्या अधिकारात खरेदी करण्यात आली. असे स्पष्टीकरण देऊन त्रिसदस्यीय समिती ताडपत्री घोटाळ्याची चौकशी करणार आहे, असे सांगून पदाधिकारी मोकळे झाले. महापालिकेत सत्ता काबीज केल्यानंतर काही महिन्यांतच आषाढी वारीच्या काळात भाजपाला भ्रष्टाचाराच्या आरोपाला तोंड द्यावे लागले. महापौर नितीन काळजे यांना महापालिकेने उपलब्ध करून दिलेली मोटार वारंवार रस्त्यात बंद पडते, अशी तक्रार दिल्यानंतरही त्यांच्या मोटारीबद्दल निर्णय होऊ शकला नाही. एका कार्यक्रमासाठी महापौर गेले, तेथे त्यांची मोटार बंद पडली. बंद पडलेली मोटार धक्का मारून न्यावी लागल्याची छायाचित्र सोशल मीडियावर आली. नवीन मोटार द्यावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी महापौरांच्या बंद मोटारीची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकाविण्यात आल्याची चर्चा आहे. अशा प्रकारे आपल्या समस्येचे जाहीर प्रदर्शन करण्याच्या कृतीबद्दल स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापौरांची कानउघाडणी केली. पालिकेत घडलेल्या या प्रकाराची वाच्यता हाऊ नये, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न झाला.
भाजपातील कारभाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर
By admin | Published: June 23, 2017 4:25 AM