पुणे : भाजपचे १९ नगरसेवक पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला बुधवारी (दि.२०) महापालिका वर्तुळात चांगलेच उधाण आले़ मात्र हे १९ नगरसेवक कोण, याचे उत्तर ना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे नव्हते ना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या. त्यामुळे ही ‘पुडी’ सोडली कोणी की खरेच १९ जण संभाव्य फुटीर आहेत याचा अंदाज घेतला जाऊ लागला आहे.
पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने बुधवारी महापालिकेत नगरसेवक व कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली होती़ मात्र भाजपच्या संभाव्य फुटीरांबद्दलची कसलीच माहिती कोणत्याही जबाबदार पदाधिकाऱ्यांकडे ‘ऑफ दि रेकॉर्ड’ देण्यासाठीसुद्धा नव्हती.
भाजपच्या वरिष्ठ माजी पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “तुम्हीच आम्हाला ती नावे सांगा़ उलट आमच्याच संपर्कात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे काही नगरसेवक आहेत़ आम्ही आता शंभर आहोत पुढच्या निवडणुकीनंतर शंभरी पार करू,” असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी-नगरसेवकांनी भाजपातल्या फुटीच्या चर्चेला चांगलीच हवा दिली. मात्र भाजपच्या संभाव्य फुटीरांची संख्या १९ नसून ५० असल्याचा आणखी मोठा दावा केला. दिवसभरच्या या बिनबुडाच्या चर्चेमुळे भाजप व्यतिरिक्तच्या इतर पक्षातील नगरसेवकांना आयते कुरण भेटले़ भाजपचे कोणीही नगरसेवक दिसले की ‘तुम्ही त्या एकोणावीसातले की विसावे,’ असे चिमटे काढले गेले.
चौकट
वर्षभर तरी मुहूर्त नाही
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या पार्श्वभूमीवर भाजपला सन २०१७ इतके यश मिळणार नसल्याची चर्चा आहे. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. ही मंडळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ पक्षात परतण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र त्यास किमान वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे आत्ताच पक्षांतर करून वर्षभराच्या नगरसेवकपदावर कोण पाणी सोडणार हा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपचा त्याग करून स्वगृही परतू इच्छिणाऱ्यांना आणखी वर्षभर तरी मुहूर्त मिळणार नाही.
चौकट
राजकीय वावड्या उठविणे बंद करा
“भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भाजपसोबतच आहेत. सर्वजण उत्तम काम करीत असून पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित असतात. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्वांशी उत्तम संपर्क आहे. नुकतीच आमची बैठक झाली असून त्याला १०० टक्के नगरसेवक उपस्थित होते. निवडणुकीच्या तोंडावर अशी पतंगबाजी होत असली तरी विरोधकांनी राजकीय वावड्या बंद कराव्यात.”
- गणेश बिडकर, सभागृह नेते, महापालिका