लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पक्षाचे सदस्य पैशाच्या जोरावर फोडून भाजपने महापालिकेतील सत्ता मिळवली. त्यांची चुकीची कामे जनतेसमोर आणून पुन्हा सत्ता मिळवू, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने बाविसाव्या वर्धापनदिनी व्यक्त केला.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते हिराबाग येथील पक्ष कार्यालयात गुरुवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. खासदार वंदना चव्हाण, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक बाबूराव चांदेरे, दीपक मानकर आदी यावेळी उपस्थित होते.
जगताप म्हणाले की, सन २०१७ चा अपवाद वगळता पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर होती. शहरातील आज दिसतात ती विकासकामे राष्ट्रवादीनेच केली आहेत. भारतीय जनता पार्टीने पक्षाचे नेते, कार्यकर्ते फोडले व सगळी राजकीय नीतीमत्ता गुंडाळून ठेवत सत्ता मिळवली. तरीही हा जनतेचा कौल समजून सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण काम करतो आहोत. आता त्यांच्या चुका लोकांसमोर आणू. आपली कामे दाखवू आणि सत्ता मिळवू.
पक्ष कार्यालयाचे पुढच्याच आठवड्यात स्थलांतर होत आहे. सध्याची जागा गिरे कुटुंबीयांनी मागील १८ वर्षांपासून पक्षाला विनामूल्य वापरासाठी दिली. वेळप्रसंगी स्वतः वीजबिल भरले. त्याबद्दल पक्ष त्यांचा ऋणी आहे अशा शब्दांत जगताप यांनी गिरे कुटुंबीयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.