पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या (PMRDA Election) 30 जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवत 16 जागांवर विजय मिळविला. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 12 (NCP), शिवसेना एक (Shiv Sena) आणि अपक्ष एक असे उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे काँग्रेसचे दोन्ही आमदारांचे कार्यक्षेत्रील भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर तालुके असताना या निवडणुकीत काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही.
पुणे महानगर नियोजन समितीच्या तीन मतदार संघात 30 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यात मोठे नागरी मतदारसंघात 22 जागांपैकी 14 जागांवर भाजप, 7 जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आले. लहान नागरी (नगरपालिका) मतदार संघातील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. तर सर्वाधिक चुरशीच्या झालेल्या ग्रामीण मतदार संघात 7 जागांपैकी 4 राष्ट्रवादी काँग्रेस, 2 भाजप आणि १ अपक्ष उमेदवार निवडून आले. पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत मोठे नागरी क्षेत्र म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका गटातून काँग्रेसच्या एकमेव उमेदवार चंदूशेठ कदम यांचा पराभव झाला आहे. पक्षीय मातांच्या कोट्यानुसार अपेक्षेप्रमाणे 22 जागांपैकी 14 जागांवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आणि शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या 22 जागांसाठी 23 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संख्या व अतिरिक्त संख्याबळ पाहता या 22 जागामध्ये राष्ट्रवादीचे , भाजपचे 14 आणि शिवसेनेचा 1 सदस्य मतांच्या कोटयानुसार निवडून जाणार हे अपेक्षित होते. पिंपरीत महापालिकेत काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. पुण्यात 10 सदस्य आहेत. तर निवडून येण्याचा कोटा पहिल्या पसंतीक्रमचा 13 मतांचा होता. तो कदम यांना गाठता आला नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या नागरी गटातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी यांनी ग्रामीण गटातून जिल्ह्यात कॉंग्रेसला एक जागा देऊ केली केली होती. मात्र, काँग्रेसच्या काही नेते आणि पदाधिका-यांनी हा प्रस्ताव नाकारून नगरसेवक चंदूशेठ कदम यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नव्हती. काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने या निवडणुकीत नक्की कोणाला धक्का बसणार याबाबत उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस उमेदवार या निवडणुकीत पराभव झाला इतर पक्षीय बलाबल यानुसार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे उमेदवार निवडून आले.