पुणे : “राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एखादे भरीव विकासकाम दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा,” अशी स्पर्धा शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केली आहे.
राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना मेट्रो, पीएमआरडीएची स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा प्रकल्प अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळाली. महविकास आघाडी सरकार राज्याच्या सत्तेत आल्याने पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, असे मुळीक म्हणाले. ‘राष्ट्रवादी’च्या पोलखोल स्पर्धेच्या नौटंकीला उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे मुळीक यांनी सांगितले. राज्य सरकारचे भरीव विकासकाम सांगणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे ते म्हणाले.