पुणे : प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरून भाजपची तारांबळ उडत असून कर्नाटकमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप जनता दल सेक्युलरसोबतची युती तोडण्यावरून कोंडी झाली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी कारवाई करतील असे सांगून वेळ मारून नेण्याची वेळ भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यावर आली आहे. मात्र, या तथाकथित व्हिडीओबाबत एक वर्षापूर्वी राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने कारवाई का केली नाही, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.
पक्षश्रेष्ठीच कारवाई करतील
पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. प्रज्वल रेवण्णा प्रकरणात मोठे खुलासे झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस सरकारनेच प्रज्वलला भारताबाहेर जाऊ देण्यात ढिलाई केली असा आरोप जाहीर सभेत केला होता. कर्नाटकमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. त्यामुळे एकीकडे या प्रकरणावरून भाजप काँग्रेसलाच दोषी ठरवत असली तरी मतदानापूर्वी भाजप जेडीएससोबतची युती तोडणार काय या प्रश्नावरून उपाध्ये यांची चांगलीच तारांबळ उडाली. याबाबत पक्षश्रेष्ठीच कारवाई करतील, असे मोघम उत्तर देऊन त्यांनी रेवण्णा प्रकरण एक वर्षापूर्वीच माहित असताना निवडणुकीदरम्यानच हा मुद्दा का उकरून काढला असा सवालही उपस्थित केला. तसेच त्याचवेळी त्यांनी कारवाई का केली नाही, असे विचारत काँग्रेसच्या महिलांवरील अत्याचाराबाबतच्या करणी आणि कथनीत अंतर असल्याचा आरोप केला.
काँग्रेसची हिंदूविरोधी भूमिका मान्य आहे का?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील जाहीर सभेतील भाषणात एससी, एसटी आरक्षण बदलणार नाही, धर्मावर आधारित आरक्षण देणार नाही, याबाबत हमी का दिली नाही, असा सवालही त्यांनी केला. कर्नाटकमध्ये त्यांनी काही विशिष्ट धर्माच्या लोकांना ओबीसीमधून आरक्षण दिले आहे. त्यामुळे एससी, एसटीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी हमी त्यांच्या नेत्यांनी द्यावी अशी मागणीही केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कलम ३७० पुन्हा आणणे, तिहेरी तलाकविषयी पुनर्विचार असे मुद्दे मांडले आहेत. हे अन्यायकारक असून याबाबत शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची ही हिंदूविरोधी भूमिका मान्य आहे का, ठाकरे यांचे हिंदूत्व पोकळ असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.