शेलपिंपळगाव (पुणे) : भाजपची रणनीती म्हणजे झुकला नाही तर जेलमध्ये आणि एखादा झुकायला तयार झाला तर त्याला वॉशिंग पावडरमध्ये धुवून सत्तेत सामील करून घ्यायचे अशी आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल झुकले नाही म्हणून त्यांना अटक करण्यात आली. मात्र आगामी काळात भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
खेड तालुक्यातील वाकी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर, 'मी सेवेकरी' सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, युवक तालुकाध्यक्ष ऍड. विशाल झरेकर, कार्याध्यक्ष ऍड. देविदास शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले तसे भाजपने आपल्या विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली. खरंतर भाजपला लोकसभेत पराभवाची चिंता सतावत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला अटक करण्याची नामुष्की भाजपावर ओढवली आहे. मात्र मला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अभिमान आहे. कारण ते भाजपसमोर झुकले नाहीत. उलट लढणाऱ्यांच्या यादीत त्यांनी आपले नाव समाविष्ट केले. अशा वाढत्या प्रकारांचा जनता कधीच स्वीकार करणार नाही. भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी होऊ पाहणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही.
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचे भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने खच्चीकरण होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेची निवडणूक ही पदासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. एकनिष्ठ विरुद्ध बेडूक उड्यांविरोधातची निवडणूक आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकिय पार्श्वभूमी नसलेली शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी वरिष्ठांना ताकद लावावी लागते हाच सर्वसामान्य जनतेचा विजय आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार