पुणे: भारतीय जनता पक्षाकडून कसबा मतदारसंघात दमदाटी, दडपशाही, पैशांचे आमिष सुरू आहे. या प्रकारांविराेधात पाेलिसांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भानुदास माली, अमित मेश्राम यांचा शिष्टमंडळात समावेश होता. पटोले यांनी आयुक्तांना सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पराभवाच्या भीतीने भाजपने मतदारसंघात भय आणि दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचे खासदार, मंत्री, आमदार यांच्या वाहनांमधून गुंडांना घेऊन फिरतात. ते दमदाटी करतात. मतदारांना प्रलोभन दाखवतात. पोलिसांच्या नावाने अनेकांना फोन जात असून, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. हे फोन काेण करत आहे ते शोधून काढावे, पोलिस यंत्रणेचा वापर भाजप अशा रीतीने करत असून, आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी याबाबत याेग्य ती पावले उचलावीत, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.