लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापती-उपसभापतिपदांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच संचालकांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून, विधानसभेनंतर झालेल्या ५ निवडणुकांमध्ये नामोहरम झालेल्या भाजपाची बहुमत नसतानाही या पदापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. ही धडपड किती टिकते, हे २५ जूनलाच समजेल. संघाच्या १७ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित ८ जागांसाठी निवडणूक झाली. बिनविरोध ९ जागा या राष्ट्रवादीच्याच असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. या जागा बिनविरोध होताना राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न, पळापळ निदर्शनास आली. या प्रक्रियेत भाजपा फारशी दिसून आली नाही. निवडणूक झालेल्या ८ जागांपैकी ४ जागांवर राष्ट्रवादीने अधिकृत विजय मिळविला. भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले माजी सभापती निळूभाऊ टेमगिरे यांनी निवडून येताच ‘मी कट्टर राष्ट्रवादीचा असल्याचे’ जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकूण जागा १४ झाल्या (बिनविरोधसह). हे १४ संचालक राष्ट्रवादीच्याच विचारांचे आहेत. मात्र, राष्ट्रवादीत पदावरून निर्माण होणाऱ्या अंतर्गत दुहीचा फायदा घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. माजी आमदार अॅड. अशोक पवार यांचा पुतण्या या निवडणुकीत (संचालकपदाच्या) पराभूत झाला. भाजपाला याचा आनंद आहेत; मात्र भाजपाला सलग पाचव्या निवडणुकीत पराभवाचे तोंड बघावे लागले, हे नाकारता येणार नाही. राष्ट्रवादीचे संचालक आपलेच असल्याचा दावा करण्यापेक्षा भाजपाने ठोस बहुमत मिळवायला हवे होते. २५ जूनला होणाऱ्या सभापती-उपसभापतिपदच्यिंा निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. मात्र, राष्ट्रवादीला सभापती-उपसभापती पक्षाचेच होतील, असा आत्मविश्वास दिसत आहे. राष्ट्रवादीत पदांसाठी मोठी स्पर्धा आहे. अंतर्गत गटबाजी आहे. याचा त्यांना अनेकदा फटका बसला आहे. मात्र, गेल्या चार निवडणुकांत तसा फटका बसलेला नाही. ज्यांच्याकडे आधीच पक्षाची महत्त्वाची पदे आहेत, त्यांनाही दुसऱ्या महत्त्वाच्या पदाची महत्त्वाकांक्षा असल्याचे या पक्षात नेहमीच दिसते. बाजार समितीच्या निवडणुकीत (सभापतिपदाच्या) ते दिसून आले आहे. नाराजीनाट्य पाहावयास मिळाले आहे. खरेदी-विक्री संघाच्या सभापती-उपसभापतिपदच्यिंा निवडणुकीत पक्षाला याची दखल घ्यावी लागेल. बाळासाहेब नागवडे, शरद कालेवार, राजेंद्र नरवडे, निळूभाऊ टेमगिरे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. सभापती, उपसभापती निवड ही नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीची डोकेदुखीच असेल. मात्र, ही डोकेदुखी संपविण्याची कसरत नेत्यांना करावी लागणार आहे. काही झाले, तरी राष्ट्रवादी ही दोन्ही पदे राखण्यासाठी वर्चस्व पणाला लावेल.
खरेदी-विक्रीवर वर्चस्वासाठी भाजपाची धडपड!
By admin | Published: June 24, 2017 5:47 AM