बारामती : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ आणि पंचायत समितीच्या १२ जागांसाठी आज काही ठिकाणचा अनुचित प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. बारामती तालुक्यात अंदाजे ६९ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. राज्यातील सत्ताबदलानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे मतदान पार पडले. बारामतीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात भाजपाने तगडे आव्हान दिल्याचे चित्र होते. मतदान शांततेत पार पडले असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी सांगितले. साधारणत: ७० ते ७२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी केलेल्या वेगळ्या प्रयोगांमुळे मतदान केंद्रांवर आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी काटेवाडीच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर, पवार कुटुंबीयांतील रोहित राजेंद्र पवार हे शिर्सुफळ-गुणवडी गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी पिंपळी येथे मतदान केले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दुपारच्या उन्हाच्या तडाख्यातदेखील मतदारांचा उत्साह कायम हंोता. यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तगडे आव्हान दिले. विशेषत: सुपा-मेडद गट, माळेगाव-पणदरे आणि डोर्लेवाडी-सांगवी गटांतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुपा-मेडद गटात भाजपाचे पुणे बाजार समितीचे सभापती दिलीपराव खैरे, माळेगाव-पणदरे गटात माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्या पत्नी विजया तावरे आणि डोर्लेवाडी-सांगवी गटातून ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे यांच्या सून निवडणूक रिंगणात आहेत. या तिन्ही गटांत भाजपाच्या नेत्यांची प्रतिष्ठेची आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचीच लढाई आहे, असे चित्र होते. पूर्वी विरोधकांना मतदान प्रतिनिधी मिळणेदेखील मुश्कील होते अथवा विरोधात उघडपणे बाहेर पडण्यास धजावत नव्हते. ते चित्र आज दिसत नव्हते. किंबहुना सुपा-मेडद गटात काही मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची रेलचेल कमी होती. हा गट सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पाण्याभोवतीच या गटातील राजकारण फिरते. दुपारी १२ पर्यंत सुमारे ३० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी मतदानाचा वेग मंदावला. दुपारी ३ नंतर पुन्हा मतदारांची गर्दी झाल्याचे चित्र होते. काटेवाडीत ७१ टक्के मतदान झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि कुटुंबीयांनी मतदान केले. सांगवी येथे ८३ टक्के, सुपे परिसरातील २४ मतदान केंद्रांवर १६ हजार ७९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील निंबूत-करंजेपूल गट, शिर्सुफळ-गुणवडी आणि वडगाव निंबाळकर-मोरगाव गटातील लढतींची फारशी चर्चा नव्हती. पवार कुटुंबातील चौथ्या पिढीच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या रोहित राजेंद्र पवार यांच्या गटात भाजपासह अन्य पक्षांचा उमेदवार तगडा नव्हता. निवडणुकीपूर्वी काकडे घराण्याशी जुळतेमिळते घेत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरवले. मागील निवडणुकीत काकडे यांनी गट आणि दोन्ही गण जिंकले होते. या गटात धैर्यशील काकडे यांनी बंडखोरी केली. वडगाव निंबाळकर-मोरगाव गटात राष्ट्रवादीच्या सुनील भगत, सुनील ढोले यांनी यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे विश्वास देवकाते, भाजपाचे माणिक काळे अशी लढत आहे. त्यामुळे या गटाकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
बालेकिल्ल्यात भाजपाचे कडवे आव्हान
By admin | Published: February 22, 2017 1:50 AM