पुणे : पुण्यात काँग्रेस भवनात विनामूल्य छत्री दुरुस्तीचा उपक्रम पुणेकाँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. मात्र, हा उपक्रम सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसच्या या उपक्रमाची भाजपने जोरदार खिल्ली उडवली आहे. पण शुक्रवारी पुण्यात काँग्रेसच्या छत्री दुरुस्तीच्या उपक्रमात चक्क भाजपची छत्री दुरुस्तीला आली आणि याची जर चर्चा झाली नसती तरच नवल ठरलं असतं.
पुण्यात काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्री दुरुस्ती उपक्रमाला सोमवारी सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली.१९ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत नागरिकांना त्यांच्या छत्र्या मोफत दुरुस्त करण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे.त्यांना हातभार लावण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असल्याचा उद्देश जोशी यांनी व्यक्त केला होता. मात्र, जसा जसा या उपक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तसे या उपक्रमाची मोठी टर उडविण्यात आली. यात भाजपा समर्थक आघाडीवर आहेत.
पण काँग्रेसभवनात शुक्रवारी चक्क भाजपचं कमळ आणि खासदार गिरीश बापट व नगरसेविका गायत्री खडके यांची नावं असलेली एक छत्री दुरुस्तीला आली. आश्चर्याचा धक्का तर बसलाच शिवाय उपस्थितांमध्ये जोरदार हशा देखील पिकला. एकीकडे भाजपकडून काँग्रेसच्या या उपक्रमाची खिल्ली उडवली जात असताना याच पक्षाच्या नेत्यांची नावं असलेली छत्री दुरुस्तीला आलेली पाहून उपस्थितांमध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या नसत्या तरच नवल.
'होर्डिंगच्या किंमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या'; काँग्रेसच्या उपक्रमावर भाजपाचा टोला
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील आता ट्विट करत काँग्रेसला टोला लगावला आहे. Nerd faceFace with tears of joyGrinning face with smiling eyes, असं म्हणत सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा, अशी टीका त्यांनी केली. तसेच या होर्डिंगच्या किंमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या, असा टोला देखील अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या या उपक्रमावर लगावला आहे