धनकवडी : राज्यात भाजपा - शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी इतर पक्षांतील कार्यकर्त्यांची लगबग सुरू असतानाच धनकवडी मध्ये मात्र भाजपाचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार व पक्षाचे अधिकृत उमेदवार भिमराव तापकीर यांचे चुलत बंधु विलास तापकीर हे रविवारी अचानक कॉग्रेस (आय) च्या व्यासपीठावर उपस्थित राहिले. त्यामुळे पुरंदर व खडकवासला या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीची चुरसच तर वाढलीच शिवाय दिवसभर उलटसुलट चर्चांना उधाण आले. विलास तापकीर हे पुणे महानगरपालिकेतील भाजपाच्या विद्यमान नगरसेविका वर्षा तापकीर यांचे पती आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांची कात्रज परिसरात रविवारी प्रचार सभा होती. या प्रचार सभेमध्ये तापकीर सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे आणि व्यासपीठावर येऊन काँग्रेस उमेदवाराला जाहिर पाठिंबा देण्यामुळे ते कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार का याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निमित्ताने भाजपामधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. तापकीर यांचा प्रवेश पुरंदर व खडकवासला मतदारसंघातील निवडणुकीचा विचार करता युतीला नक्कीच मारक ठरू शकतो.
तापकीर यांच्या पत्नी वर्षा तापकीर महापौर पदासाठीच्या प्रबळ दावेदार असुन त्यांच्या नावाची पक्षात तशी चर्चा सुरू असतानाच विलास यांच्या या भुमिकेमुळे धनकवडीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलेला आहे.