पुणे : जेएनयु येथे करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखिल विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ते गरवारे महाविद्यालयाच्या इथे एकत्र जमले होते . त्यादरम्यान टिळक रस्त्यावरील कार्यालयाला राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील घटनेचा निषेध म्हणून अभाविपच्या फलकाला काळं फासल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि. ७) दुपारी घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , टिळक रस्त्यावर अभाविपचे महानगर प्रांत कार्यालय आहे. मात्र, जेएनयु इथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत असताना त्याचे लोन पुण्यात देखील आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एफटीआयआय अशा विविध ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप देखील सातत्याने केला जात आहे. त्याच धर्तीवर अभाविपकडून हल्ल्याचा निषेध नोंदवत हा हल्ला त्यांनी केला नसल्याचा खुलासा देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व कार्यकर्ते आज गरवारे महाविद्यालयाच्या इथे एकत्र आले होते. त्याठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी गेलेल्या वेळेतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे १५ ते वीस कार्यकर्ते टिळक रस्त्याच्या अभाविपच्या कार्यालयालयाजवळ एकत्र आले त्यांनी अभाविपविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या फलकाला काळं फासले.
महानगर मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगर कार्यालयास काळे फासण्याचे निंदनीय कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी केले आहे. या घटनेचा अभाविप तीव्र निषेध करते.या घटनेविरोधात अभाविपने पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून पोलिस प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता कार्यवाही करावी व असे कृत्य करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविप करत आहेत.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी अभविप चे कार्यकर्ते गरवारे महाविद्यालयात गेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी कार्यालयाला काळे फासण्याचे निंदनीय कृत्य केले आहे. पुणे महानगरातील अनेक कार्यकर्ते कार्यालयाजवळ जमून या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत.ज्यांनी ही घटना घडवून आणली त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुंडांमध्ये दम असेल तर त्यांनी आता कार्यालयात येऊन दाखवावे असा इशारा महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी यावेळी दिला.