पुणे : पालिकेतील सत्तेची भारतीय जनता पार्टी वर्षपूर्ती साजरी करत असतानाच विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने या सत्तेचा निषेध म्हणून गुरुवारी काळा दिवस पाळणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढणाऱ्या मोर्चात आता काँग्रेसही सहभागी होणार असून, आता हा मोर्चा आघाडीचा मोर्चा असेल. काळा गणवेश परिधान करून सर्व नेते, कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत.लालमहालापासून दुपारी साडेतीन वाजता मोर्चा निघणार आहे. तो पालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर येईल. तिथे नेत्यांची भाषणे होणार आहेत. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी आठ दिवस आधीच मोर्चाची घोषणा केली होती. त्या वेळी काँग्रेसचा त्यात सहभाग नव्हता, मात्र गुरुवारी अचानक काँग्रेसनेही सहभागी होण्याचे जाहीर केले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना विचारले असता त्यांनी हा आघाडीचाच मोर्चा असेल असे सांगितले. राष्ट्रवादीने आधीच जाहीर केले, मात्र विरोधकांमध्ये फूट दिसायला नको यासाठी आम्हीही त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भाजपाच्या पालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराला आघाडीच्या माध्यमातूनच उत्तर दिले जाईल,असे शिंदे म्हणाले. पक्षाचे सर्व नगरसेवक यात सहभागी होतील, अशी माहिती त्यांनी दिली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी काँग्रेसबद्धल समाधान व्यक्त केले.
भाजपाविरोधातील मोर्चात काँग्रेसही असणार, राष्ट्रवादी पाळणार काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:23 AM