बारामती : बारामतीतील नगर परिषदेच्या गणेश मार्केटच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमपत्रिकेमध्ये मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे फोटो न टाकल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी बारामतीमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना काळे झेंडे दाखवले. या इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनाच्या कार्यक्रमपत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे यांचे फोटो न टाकल्याच्या निषेधार्ध माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे भाषण सुरू झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. दरम्यान, काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्ते सुरेंद्र जेवरे यांना मारहाण केल्याचा आरोपही भाजपा पदाधिकाºयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार साबळे यांनी बारामती शहरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेतली. तसेच या घटनेबाबत त्यांची भूमिका मांडली.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधकांशीदेखील मैत्रीसंबंध जोपासले. मात्र, त्यांची मान खाली जाईल असे कृत्य झाले आहे. त्यासाठी त्यांचे अनुयायी जबाबदार आहेत, असे भाजपा खासदार अमर साबळे यांनी सांगितले. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष यशपाल भोसले, प्रशांत सातव, सुरेंद्र जेवरे, जहीर पठाण, अॅड. नितीन भामे आदी उपस्थित होते.
भाजपा कार्यकर्त्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या तिघांवर गुन्हाबारामती : गणेश मार्केटच्या इमारत उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भाषण सुरू असताना काळे झेंडे दाखविणाºया भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे यांनी फिर्याद दिली आहे. श्री गणेश भाजी मंडई बहुमजली इमारत उद्घाटन कार्यक्रमात नगरपालिकेने राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाºयास आमंत्रित केले नाही. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करीत होतो. या वेळी पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. पोलीस आम्हाला व्यासपीठाच्या बाजूने नेत असताना अभिजित कै लास चव्हाण, सुधीर पानसरे, नवनाथ ऊर्फ पप्पू बल्लाळ यांनी लाथा-बुक्क्या, फायटरने मारहाण केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामध्ये बल्लाळ, पानसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत.