पिंपरी : लग्नात आमचा मानपान पाहिजे तसा झाला नाही, अपेक्षेप्रमाणे सोने मिळाले नाही, या कारणावरून विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी जेवणात उदी टाकून बेडरुममध्ये मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेवून तिला भीती घातली. तसेच डोकेदुखीची गोळी म्हणून गर्भपाताची गोळी तिला खाण्यास दिली. ही घटना ११ नोव्हेंबर २०२० ते ५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत भोसरी येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पाच जणांवर कौटुंबिक छळ तसेच अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लग्नात मानपान नीट झाला नाही, या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला त्रास दिला. फिर्यादी गर्भवती असताना डोकेदुखीची गोळी म्हणून फसवून गर्भपाताची गोळी दिली. तसेच जादूटोणा करून गर्भपात करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या जेवणात उदी टाकून तसेच बेडरुममध्ये ठिकठिकाणी मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेवून फिर्यादीच्या मनात जीवाची भीती उत्पन्न केली.
फिर्यादीवर संशय घेऊन खासगी व्यक्तीकडून मोबाईलच्या सीडीआर काढून त्यातील मोबाईल नंबरवर फोन करून फिर्यादीची बदनामी होईल, मनात लज्जा उत्पन्न होईल, असे आरोपी बोलले. फिर्यादीच्या दिराने फिर्यादीशी लगट करण्याचा प्रयत्न करून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पोलीस पुढील तपास करत आहेत.