पुणे : म्यूकरमायकोसिस या आजाराच्या उपचाराकरिता वापरले जाणारे लिपोझोमेल अँफोटेरीसीन या इंजेक्शनचा काळाबाजार केल्या प्रकरणातील दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन जी. पी. अगरवाल न्यायालयाने बुधवारी फेटाळला.
धीरज भागवत शिंदे (रा. घाटकोपर मुंबई ) व रोहित चत्रभुज बोराडे (रा. घाटकोपर मुंबई व सुंदरबाग लेन काजूपाडा कुर्ला वेस्ट साकीनाका मुंबई) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणामध्ये रवींद्र भरत माने (वय ३५, रा. गुलमोहर को. ऑप सोसायटी, सी बिल्डिंग, देशमुखनगर, शिवणे) आणि अनिकेत शिवाजी रसाळ ऊर्फ सागर (वय २१ रा. जाधव निवास, नारायणनगर लातूर) यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यात मुख्य आरोपी माने याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी सुहास तानाजी सावंत (वय ४१, आयडियल कॉलनी कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी रोहित बोराडे याने माने याच्यासमवेत संगनमत करून म्यूकरमायकोसिस या आजाराच्या उपचाराकरिता वापरले जाणारे लिपोझोमेल अँफोटेरीसीन या इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. माने याने गैरमार्गाने विक्री केलेली इंजेक्शन बोराडे आणि धीरज शिंदे यांनीच पुरवठा केल्याचे उघडकीस आले आहे. काळ्या बाजाराने उपलब्ध केलेली लिपोझोमेल अँफोटेरीसीन बी हे इंजेक्शन कुणाकडून प्राप्त केले याची माहिती पोलीस कोठडीमधून मिळू शकते. त्याकरिता आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीमध्ये तपास करणे आवश्यक आहे. बोराडेला जामीन मंजूर झाला तर तो गुन्ह्याच्या तपासात सहकार्य न करता तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास त्याच्यावर कायद्याचा धाक राहणार नाही आणि तो अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरीत आरोपींंचा अटकपूर्व जामीन फेटाळला.