पुणे: सिंहगड रोड पोलिसांनी छापा टाकून गॅसच्या ७२ टाक्या पकडल्या. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ लहू भोजने (वय ३१, रा. वडगाव बुद्रुक, मूळ तुळजापूर) याला अटक केली असून, त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. टाक्या विक्री करण्यास देणाऱ्या विकाश धोंडाप्पा आकळे (रा. वडगाव बुद्रुक) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७, २८८, ३ (५) सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगंडे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की, वडगाव भाजी मंडई येथून गोयल गंगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीलबंद व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैधरीत्या विक्री होत आहे. त्यानुसार, उपनिरीक्षक भांडवलकर व त्यांच्या पथकाने येथे धाव घेतली. सापळा रचून सोमनाथ याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो टेम्पोत टाक्या घेऊन विक्री करत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला या टाक्या मालक विकास आकळे यांनी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी एचपी तसेच भारत कंपनीच्या तब्बल ७२ गॅस टाक्या आणि टेम्पो असा १० लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहेत.