पुणे : घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून सुरू असलेला काळाबाजार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. वडगाव बुद्रुकमधील तुकाईनगर भागात ही कारवाई केली. त्यात ११४ गॅस सिलिंडर, ७ रिफिलिंग पाईप, रेग्युलेटर, २ टेम्पो १७ लाख २२ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. तेथील चौघांना अटक केली आहे.
रफिक सुलतान शेख (वय ३८), जमीर सुलतान शेख (वय ३६, दोघेही रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक), देवीसिंग रामसिंग राजपूत (वय ३६, रा. बिबवेवाडी), सद्दाम अजीज शेख (वय २९, रा. तुकाईनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस शिपाई संदीप कोळगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वडगाव बुद्रुक भागातील तुकाईनगर येथील मंगल रिढे यांच्या खोलीमध्ये हा प्रकार सुरू होता.
काही महिन्यांपूर्वी सातारा रोडवरील एका गोदामात अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरले जात होते. त्यावेळी मोठी आग लागली होती. वडगाव बुद्रुक येथील एका खोलीत अशाप्रकारे आरोपी घरगुती सिलिंडरचे व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये रिफिलिंग करत होते. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे छापा टाकून कारवाई केली.