पुणे : ऑनलाईन चॅटिंग करुन त्यांचे फोटो ऑनलाईन डेटिंग ॲपद्वारे ब्लॅकमेलिंग करुन तरुणींना धमकावून खंडणी मारणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने अटक केली आहे.
संदीप जगन्नाथ धर्मक (वय २८, रा. थेरगाव, पिंपरी चिंचवड, मुळ बिदर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली होती. या तरुणीची ‘सोशल मिडिया’वर एकाशी ओळख झाली होती.
आपण न्यूयाॅर्क येथे नोकरी करीत असल्याची बतावणी त्याने केली. त्यांच्यात संवाद वाढल्यावर त्याने तिला फोटो पाठविण्याची विनंती केली. या तरुणीने त्याला काही फोटो पाठविले. ते फोटो ऑनलाईन डेटिग साईटवर टाकण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली. हे फोटो प्रसारित झाल्यावर आरोपीने तिला पुन्हा धमकावण्यास सुरुवात करुन तिच्याकडे १ लाख रुपयांची खंडणी मागितली. तेव्हा घाबरुन तिने पोलिसांकडे धाव घेतली होती. याचा समातर तपास गुन्हे शाखेतील युनिट २चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस नाईक उत्तम तारु, मितेश चाेरमोले व समीर पटेल यांनी अशाप्रकारे पुणे शहरात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन तांत्रिक तपास केला. त्यातून संदीप धर्मक याला थेरगाव येथुन ताब्यात घेण्यात आले.
संदीप धर्मक याने लॉकडाऊनच्या काळात टिंडर व हिज या ॲपवर नॉरमन व रेयान या परदेशी नागरिकांचे फोटो टाकून दोन बनावट प्रोफाईल तयार केले. त्यावरुन तो पुण्यात मसाज सेंटरवर मॅनेजर म्हणून काम करीत असल्याचे सांगून महिलांची ऑनलाईन चॅटिग करत होता. त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे आक्षेपार्ह फोटो घेत होता. त्यानंतर फोटो व चॅट व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करीत होता. त्याने अशा प्रकारे बऱ्याच महिलांशी चॅटिंग करुन त्रास दिल्याचे दिसून आले आहे. मात्र स्वत:च्या बदनामीला घाबरुन त्या तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
त्याने भारती विद्याापीठ परिसरातील एका तरुणीला धमकावल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, वैशाली भोसले, उत्तम तारू, मितेश चोरमेले, समीर पटेल यांनी ही कारवाई केली.