चिंचवड : शहरातील पिंपरी, चिंचवड व निगडी येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आगारात सुट्टे पैसे परस्पर बदलून ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा भरणा केला जात आहे. अशा प्रकारे पीएमपी प्रशासनातील काही अधिका-यांनी राजकारण्यांशी संगनमत करून काळा पैसा चलनात आणण्याचा उद्योग सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कामगार युनियने केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध आगारात दररोज लाखो रुपये जमा होतात. त्यामध्ये सुट्टे पैशांचे प्रमाण ८० ते ९० टक्के आहे. त्यामुळे रोजची आगारात जमा होणा-या सुटया पैशांची रक्कम परस्पर बदलून बँकेत केवळ ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा भरणा केला जात असल्याचा घोटाळा सुरू आहे. त्यामुळे आगारात वाहकांकडून दररोज जमा होणाऱ्या रकमेचा भरणा व बँकेच्या खात्यात जमा केलेल्या नोटांचे विवरण तपासावे. तसेच, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कामगार युनियनने पीएमपी व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली आहे. शिवाय या प्रकरणाची तक्रार आयकर विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पैसे भरणा करण्यातून येणारी रक्कम घेण्याचे काम रोखपालाचे आहे. पासविक्री व तिकीट विक्रीतून येणारे पैसे थेट बँकेत भरले जातात. खात्याच्या निर्देशानुसार पैसे स्वीकारण्याचे काम आगारात सुरु आहे. पीएमपी प्रवाश्यांकडून ५०० व १००० च्या नोटांची स्वीकृती २४ तारखेपर्यंत करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असे पिंपरी आगार व्यवस्थापक बाबा वाघेरे यांनी सांगितले.(वार्ताहर)
‘पीएमपी’त काळाबाजार
By admin | Published: November 17, 2016 3:33 AM