लक्ष्मण मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दाद मागण्यासाठी गेलेल्या तक्रारदारालाच धमकावून लँडमाफियाला पाठीशी घातल्याचा ठपका एका सहायक पोलीस आयुक्तावर ठेवण्यात आला आहे. पिंपळे निलख येथील एका नागरिकाच्या जमिनीवर बेकायदा ताबा घेतलेल्या लँडमाफियांना पाठीशी घालून त्यांनाच एका महिला अधिकाऱ्याने मदत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपायुक्तांमार्फत करण्यात आलेल्या चौकशीमध्येही संबंधित अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा अहवाल पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना सादर करण्यात आला आहे. मात्र, एप्रिल महिन्यात हा अहवाल येऊनही त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलीस आयुक्तालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथे एका नागरिकाचे ३२ गुंठे आणि ९ गुंठे असे दोन भूखंड आहेत. या भूखंडांवर अतिक्रमण करून काही जणांनी त्याचा बेकायदा ताबा घेतला होता. त्यांना एका राजकीय पुढाऱ्याच्या निकटवर्तीयाने पाठिंबाही दिलेला होता. जागामालकाकडे जमिनीची सर्व कागदपत्रे असतानाही स्थानिक पातळीवर काहीच दखल घेतली जात नव्हती. पोलिसांकडे वारंवार तक्रार करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलीस ठाण्यामध्येही यासंदर्भात तक्रार करण्यात आली, मात्र त्यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. दाद मागण्यासाठी त्यांनी त्या विभागाच्या तत्कालीन सहायक आयुक्तांकडे मार्चमध्ये तक्रार केली. तक्रारदार स्वत: सहायक आयुक्तांना भेटायला गेले तेव्हा त्यांना दोन तास कक्षाबाहेर ताटकळत ठेवण्यात आले. आपली कैफियत मांडण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला बाहेर बसवून संबंधित सहायक आयुक्त ज्यांनी जागेचा ताबा घेतला आहे त्यांनाच घेऊन दोन तास चर्चा करीत बसल्याचे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कक्षामधून ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे त्यांनाच बाहेर पडताना पाहिल्यानंतर तक्रारदाराला धक्काच बसला. सहायक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनाच दमदाटी करण्यात आली. यासोबतच पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या अर्जावर तपास करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सहायक निरीक्षकालाही या सहायक आयुक्तांनी ही बाब दिवाणी असून तुम्ही का त्यामध्ये हस्तक्षेप करता, असा दम भरला होता. आपल्याला न्याय मिळणार नाही, याची कल्पना आल्यावर तक्रारदाराने पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे धाव घेतली. घडलेल्या सर्व प्रकाराबाबत एप्रिलमध्ये त्यांनी शुक्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी परिमंडल तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांना दिले. त्यानुसार, शिंदे यांनी सखोल चौकशी केली. संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले. या चौकशीमध्ये संबंधित सहायक आयुक्तांनी लँडमाफियांना मदत केल्याचे निष्पन्न झाले. तसा ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ अवघ्या पंधरा दिवसांत पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला. मात्र, त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही.
लँडमाफियाला मदत केल्याचा सहायक पोलीस आयुक्तावर ठपका
By admin | Published: June 21, 2017 6:24 AM