इंदापूर : संस्था जागा स्वच्छताप्रकरणी रविवारी (दि.२७) घडलेल्या कथित मारहाण व चोरी प्रकरणातील आरोपी युवराज ऊर्फ सुधीर पोळ यांनीही रविवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्यासह अकरा जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.रत्नाकर मल्हारी मखरे, संतोष रत्नाकर मखरे, गोरख तिकुटे, दादा पोपट जगताप, पोपट जगताप बाळू जगताप, मनीषा राहुल मखरे, स्मिता संतोष मखरे, समता सुधीर मखरे बेगम पोपट जगताप, रेखा जगताप (सर्व रा.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.सकाळी साडेदहा वाजता फिर्यादी आपल्या घरासमोर पिंपळाच्या झाडाखाली वर्तमानपत्र वाचत बसला असताना रत्नाकर मखरे, संतोष रत्नाकर मखरे,गोरख तिकुटे,दादा पोपट जगताप,पोपट जगताप व बाळू जगताप हे तेथे आले. रत्नाकर मखरे यांनी ‘तुला लई माज आलाय का?’ असे म्हणून शिवीगाळ करून आपणास हाताने मारहाण केली. संतोष मखरे याने मला त्याच्या हातातील काठीने छाती व पाठीवर मारले. इतरांनी खाली पाडून गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची साखळी ओढून घेऊन आपणास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मनीषा राहुल मखरे, स्मिता संतोष मखरे, समता सुधीर मखरे बेगम पोपट जगताप, रेखा जगताप यांनी घरात शिरून आपल्या पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठण तोडून घेतले.मुलगा सम्राट सोडवण्यासआला असता आरोपी इसमांनी त्यालादेखील मारहाण केली. तू इथे रहायचे नाही. ही जागा आमची आहे. परत इथे दिसलास तर तुझे घर जाळून टाकू. मुलांना मारुन टाकू, अशी धमकी देत, शिवीगाळ करत सर्वजण तेथून निघून गेले,असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अद्यापि कुणाला अटक करण्यात आली नाही.फौजदार अमोल ननावरे अधिक तपास करत आहेत.स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपास करण्यात यावाइंदापूर : ‘आपण दाखल केलेल्या फिर्यादीचा व आपल्याविरुद्ध दाखल केलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास इंदापूर पोलिसांकडून काढून घ्यावा. तो स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावा,’ अशी मागणी माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी निवेदनाद्वारे पोलीस महासंचालकांकडे केली आहे. याबाबत निवेदनात नमूद केलेली माहिती अशी : दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहासाठी इंदापूर नगर परिषदेने दिलेल्या जागेची व तेथील खोल्यांची स्वच्छता करण्यासाठी आपण विद्यार्थी व कर्मचाºयांसमवेत गेलो असताना सुधीर पोळ, त्यांचा मुलगा व बायको यांनी प्रतिबंध केला. दरम्यान, घडलेल्या घटनेची फिर्याद आपण इंदापूर पोलीस ठाण्यात दिली. आरोपी सुधीर पोळ याने आपणासह इतर १० जणांवर दरोड्याची तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.सदर प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपास व्हावा. कारण, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे कोणत्याही व्यक्तीने तक्रार केली की, त्या प्रकरणातील आरोपीला बोलावून संबंधिताविरुद्ध तक्रार द्यायला लावतात. सुधीर पोळ याचे सजन हंकारे यांच्याशी मैत्रीचे सबंध आहेत. आपण यापूर्वी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या कारभाराविरुद्ध अनेक आंदोलने, तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे सुधीर पोळ यास मदत करण्यासाठी हंकारे यांनी आपल्या सहकाºयांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप मखरे यांनी केला आहे.इंदापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हंकारे हे सुधीर पोळ याच्यामार्फत पैशाचे व्यवहार करतात. त्या दोघांची नार्को व ब्रेनमॅपिंग चाचणी करावी. त्यामध्ये ते दोषी आढळले नाहीत तर भर चौकात मला फाशी द्यावी, असे नमूद करून या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तो पर्यंत आश्रम शाळा पोलीस ठाण्यातच भरवली जाणार असल्याचे मखरे यांनी म्हटले आहे.
मखरेंसह ११ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 2:53 AM