पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुख्य परीक्षा केंद्रांवर पाठविलेल्या कोऱ्या उत्तर पत्रिका व इतर शैक्षणिक साहित्य सांभाळण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर येऊन पडली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला आहे. मात्र, या उत्तरपत्रिकांचे अद्याप प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर वितरण केलेले नाही. त्यामुळे बहुतांश मुख्याध्यापक-प्राचार्य निश्चिंत आहेत.
राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य मुख्य परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले आहे. या परीक्षा केंद्रांवरून प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कोऱ्या उत्तर पत्रिका नकाशे व तोंडी परीक्षेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुणे विभागातून अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून बारावीचे २ लाख ३० हजार ९८३ विद्यार्थी तर दहावीचे २ लाख ७१ हजार ५०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य सध्या मुख्य परीक्षा केंद्राच्या ताब्यात आहे. मात्र, सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत हे साहित्य वाटल्यानंतर ते सांभाळण्याची मुख्याध्यापकांवरील जबाबदारी वाढणार आहे.
-------
पुणे विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
दहावीतील विद्यार्थी - २ लाख ७१ हजार ५०३
मुले -१,५०,६९०
मुली-१,२०,७९७
बारावीतील विद्यार्थी - २ लाख ३० हजार ९८३
मुले -१,२६,६०६
मुली-१,०४,३३७
---
ताब्यातील साहित्य :
कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदी मुख्य परीक्षा केंद्रावर कस्टडीत आहे.
---
परीक्षा व पुढील प्रवेश कधी?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा कधी घोषित केल्या जाणार आणि परीक्षा केव्हा होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे या परीक्षांचा निकाल जाहीर करून पुढील प्रवेश प्रक्रिया केव्हा राबवणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
--
मुख्य परीक्षा केंद्रांना बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य राज्य मंडळाकडून मिळाले आहे. परीक्षा कालावधीत एक ते दोन महिने हे साहित्य सांभाळावेच लागते. त्याचा कुठलाही त्रास नाही. सध्या उपकेंद्रांना हे साहित्य वितरित झालेले नाही.
- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा
---
कोऱ्या उत्तरपत्रिका व प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य सांभाळण्याचा मुख्याध्यापकांना कोणताही त्रास होत नाही. केवळ शैक्षणिक साहित्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिल्लक राहिले तर पुढील वर्षी सुद्धा त्याचा वापर करता येतो. मात्र, त्याची नीटपणे नोंद ठेवावी लागते.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ
--
मुख्य परीक्षा केंद्रांना शैक्षणिक साहित्य सांभाळण्यासाठी कस्टडी तयार करावी लागते. प्रश्नपत्रिका सुरक्षित राहाव्यात यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करावा लागतो. सध्या मुख्य परीक्षा केंद्रांवरून सर्व शाळांपर्यंत हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालेले नाही. परंतु, ते वितरीत होईल. त्यावेळी मुख्याध्यापकांचा ताप वाढणार आहे.
- अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाईट हायस्कूल