लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : लष्कराच्या खडकीतील दारूगोळा कारखान्यात सकाळी सव्वानऊच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेवेळी मोठा स्फोट झाला. या आवाजाने खडकी परिसर हादरून गेला. स्फोटात फॅॅक्टरीतील कामगार अशोक डुबल (वय ४७, रा. रेंजहिल्स, खडकी) आणि मरिया (अण्णा) रॉक (वय ५०, रा. आॅर्डनन्स फॅक्टरी वसाहत) यांचा जागीच मृत्यू झाला. भारतीय संरक्षण विभागांतर्गत खडकी आयुध निर्माण फॅक्टरी (दारूगोळा कारखाना) येथे सकाळच्या सत्रात काम सुरू असताना, दारूगोळा उत्पादन विभाग-२मध्ये ९.२०च्या सुमारास स्फोट झाला. मोठा आवाज होताच कामगारांची पळापळ झाली. स्फोटाने परिसर हादरला. मोठी आगही लागली. संरक्षण खात्याच्या अग्निशामक विभागाची वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. चार वर्षांपूर्वी अशीच दुर्घटना फॅक्टरीत घडली होती. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता, तर दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेत दापोडीतील एक कामगार जायबंदी झाला होता. या आठवणी आज या स्फोटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कामगार बोलून दाखवत होते.
पुण्याच्या दारूगोळा कारखान्यात स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू
By admin | Published: June 16, 2017 1:04 AM