लोकमत न्यूज नेटवर्क, सोमेश्वरनगर (जि. पुणे) : प्रत्येकाचा एक काळ असतो. उमेदीच्या काळातच कामे होत असतात. विकास फक्त मीच करू शकतो. उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावे, असे शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावत कुणी भावनिक केले, तर त्याला बळी न पडता मी देईन तो खासदार विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अजित पवार यांनी गुरुवारी बारामती तालुक्याचा मॅरेथॉन दौरा केला. यावेळी कोऱ्हाळे बुद्रुक येथील सभेत बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा दहा हजार कोटींचा आयकर मोदी-शाह यांनी माफ केला. शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. दुधाला अनुदान दिले. पोलिस पाटील, आशा सेविकांचे मानधन वाढवले. साडेआठ लाख सौर कृषीपंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.
मी तुमच्यासाठी जिवाचे रान करतोय. मी नसतो तर उन्हाळ्यात नीरा डावा कालव्याला पाणी मिळाले नसते. तुम्हाला फोन येतील. मात्र, अशा वेळी भावनिक न होता विकासाच्या मागे उभे राहा, असे आवाहनही त्यांनी केले.