पुणे : चौरंगाभोवती आकर्षक फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी... सनईचे मंजूळ सूर... आणि सासरकडच्या आग्रहात विवाहित अंध दाम्पत्यांनी गुरुवारी दुपारी कस्तुरे चौकातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अधिक मासानिमित्त धोंड्याचा आनंद लुटला.गणेश पेठेतील श्रीकाळभैरवनाथ तरुण मंडळाने हा अनोखा योग जुळवून आणला. वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग संस्थेतील जोडपी होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सासरची भूमिका बजावली. त्यांनी आपल्या पाहुणे म्हणून आलेल्या जावयांचा व मुलींचा पारंपरिक व धार्मिक पद्धतीने खास सन्मान केला .आज दुपारी १२ वाजता या संस्थेतील पांच जोडप्यांचे आगमन झाले. त्यांचे खास स्वागत केल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारची आरती करण्यात आली. त्यानंतर लुई ब्रेल संस्थेचे संस्थापक अर्जुन कंधारे व त्यांची पत्नी नूतन होळकर, नवनाथ गाडे व त्यांची पत्नी निर्मला, सोमनाथ गायकवाड व त्यांची पत्नी सुमित्रा, योगेश वाघमारे आणि त्यांची पत्नी संगीता व शिवाजी शिंदे आणि त्यांची पत्नी नंदा यांची मंडळाचे कार्यकर्ते व प्रमुख पाहुण्यांनी पूजा केली.त्यानंतर पोशाख, साडीचोळी, चांदीच्या जोडव्या, तांब्याची भांडी, ताटवाटी, अनारसे, ताम्हण, निरांजन देऊन खास सन्मान करण्यात आला. त्यानंतर आमरस पुरी, भाजीचा भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.हा आमच्या आयुष्यातील वेगळा आनंद आहे. आजपर्यंत अधिक मासानिमित्त धोंड्याचा सन्मान कुणी केला नव्हता. हा योग आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच येत आहे.- अर्जुन कंधारे, संस्थापक लुई ब्रेल संस्था1 याप्रसंगी श्री लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित, कुमार रेणुसे, पीयूष शाह, शाहीर हेमंत मावळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ व त्यांचा पत्नी कल्याणी सराफ, विजया पवार, संगीता मावळे आदींच्या हस्ते या अंध जोडप्यांना धोंड्याचा खास सन्मान करण्यात आला .2 या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष चेतन शिवले, उमेश सपकाळ, सागर पवार, विकास शिवले, शिवाजी महाडिक, सूरज आणवेकर, ओंकार सपकाळ आदी कार्यकर्त्यांनी या अनोख्या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
अंध जोडप्यांनी अनुभवला अधिक मासाचा पाहुणचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 5:20 AM