डॉ. रघुनाथ माशेलकर : पुणे ब्लाईंडनेस सपोर्ट ग्रुपचे उद्घाटन
पुणे : तंत्रज्ञान हे बाह्य स्वरूपात बदल करू शकेल पण आंतरीक बदल करायचे ठरवल्यास कोणतीही गोष्ट असाध्य नाही. दृष्टीहिनांनी मनोधैर्याने आणि दृढ निश्चय ठेऊन आव्हानांचा सामना केला, तर काहीही अशक्य नाही, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
पुणे ब्लाईंडनेस सपोर्ट ग्रुपच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट व ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष नेत्रतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या मुळे उपस्थित होते.
१८ वर्षावरील व्यक्तींसाठी काही तरुणांनी एकत्र येत पुणे ब्लाईंडनेस सपोर्ट ग्रुप या मदत गटाची स्थापना केली आहे. हा मदत गट वैद्यकीय किंवा रोजगारासाठी काम करणार नसून दृष्टीहिनांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी काम करणार आहेत.
डॉ. माशेलकर म्हणाले, सर्वसामान्यांना ज्ञान आणि विज्ञानाचा फायदा व्हायला हवा. येत्या काळात तंत्रज्ञानामुळे मोठा बदल घडणार आहे. ‘बायोनिक आय’ या संकल्पनेबाबतचे संशोधन शेवटच्या टप्प्यात असून ते भारतात यायला आणखी काही कालावधी जावा लागेल. मात्र, ही संकल्पना सामान्य रुग्णांच्या आवाक्यात येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि भारतात हे प्रयत्न नक्की होतील याबाबत मला खात्री आहे. तसेच डॉ. मुळे त्यांच्यातील संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
ज्ञान प्रबोधिनीचे डॉ. बापट म्हणाले, ज्याने एखाद्या दु:खाचा अनुभव घेतला आहे. त्याला त्यातील सर्व माहिती असल्याने तो व्यक्ती इतरांना मदत करतो. अशाप्रकारे स्वत: कठीण परिस्थितीत असताना आपल्यासारख्यांना मदत करण्यासाठी मोठा आशावाद आणि मनोबलाची आवश्यकता असते.
डॉ. मुळे यांनी ग्रुपच्या स्थापनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सकाळी ९.३० ते ११.३० सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी येथे दृष्टिहिन व्यक्तींसाठी मोफत उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
डॉ. मुळे या उपक्रमाच्या प्रमुख आहे. तर मानसोपचारतज्ज्ञ केतकी रेडीज, गायिका वेदांगी पटवर्धन, कथावाचक आरती, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली ओक काम करणार आहेत.