पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनने अंध विद्यार्थ्यांना लेखनिकाच्या मदतीशिवाय ऑनलाइन परीक्षा देता येईल, असे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. प्रायोगिक तत्त्वावर एका विद्यार्थ्याची या पध्दतीने यशस्वीरीत्या परीक्षा घेण्यात आली असून त्याचा निकालही व्यवस्थितपणे तयार झाला. त्यामुळे विद्यापीठाने एक मोठी कामगिरी साध्य केली आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांच्या ६७६ अंध विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. शासन नियमानुसार अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक देणे व वीस मिनिटे अधिकचा वेळ देणे आवश्यक आहे. परंतु, करोना काळात आम्हाला लेखनिक नको, आम्हाला अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देता येईल, अशी सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनशी संवाद साधला.
कोणाच्याही मदतीशिवाय अंध विद्यार्थी परीक्षा कसे देऊ शकतात. यावर विचार करण्यात आला त्यातून परीक्षेसाठीच्या प्रणालीमध्ये अॅक्सेसिबिलिटीनुसार बदल करण्याचे काम एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनकडे देण्यात आले. अॅक्सेसेबिलिटीमध्ये आवश्यक बदल करून ऑनलाइन प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय श्राव्य पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. विधी अभ्यासक्रमाच्या एका अंध विद्यार्थ्याची प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन परीक्षा घेण्यात विद्यापीठाला यश आले. अंध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची सुविधा उपलब्ध करून देताना परीक्षेची गोपनीयता आणि गुणवत्ता राखली आहे. त्यामुळे आता याच पद्धतीने परीक्षा देता येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले.