इंदापूर : दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सकाळी ( दि.२६) शेतक-यानी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुध ओतून देत रास्ता रोको आंदोलन केले. कांदलगाव येथील ओंकार सरडे व पेटकरवस्ती येथील सागर पेटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दादा देवकर, धनाजी ननावरे, विजय शिंदे, बंटी रेडेकर, श्रावण चोरमले, महादेव सोमवंशी, लेमन गावडे व इतर शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक दिलीप पवार व मंडलाधिकारी सोपान हगारे यांनी आंदोलनकर्त्यांनी निवेदन स्वीकारले. या संदर्भात ओंकार सरडे व सागर पेटकर यांनी सांगितले की, मागील कालावधीपासून दुधाचा दर सातत्याने घसरत चालला आहे. सध्या तो ३५ रुपयांवरुन अचानक कमी होवून २५ रुपयांवर आला आहे. त्यामुळे दुध उत्पादकांना मोठ्या अर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. शेती पिके की नाही याची खात्री नाही. किमान दुधाच्या व्यवसायातून तरी घरप्रपंच चालवता येईल या हेतूने सर्व स्तरातील तरुण शेतकरी खस्ता काढत, जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था करत आहेत. मात्र दुधाच्या पडत्या दराने शेतक-यांच्या कष्टाची पार माती केली. जनावरांच्या पालनपोषणाची खर्च ही निघेनासा झाला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही तहसीलदारांकडे रीतसर निवेदन देवून हे आंदोलन केले आहे. याने फरक पडला नाही तर अधिक उग्र आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.
दुध उत्पादकांच्या मागण्या
दुधाला प्रती लिटर ४० रुपये दर मिळावा. जनावरांसाठी चारा डेपो तयार करावेत. शासनाकडून पेंड मिळावी. प्रत्येक गावात पशु वैद्यकीय दवाखाना सुरु करावा. गेल्या पाच वर्षातील भेसळ प्रतिबंधक कारवायांचा अहवाल सादर करावा. जनावरांसाठी विनाशुल्क विमा सुरक्षा कवच योजना सुरु करावी. दूध दर मुल्य आयोगाची स्थापना करावी, शासकीय हमी भावाप्रमाणे दर न देणाऱ्या सरकारी व खाजगी प्रकल्पांवर कारवाई करावी.