लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील अनेक रक्तपेढ्यांमध्ये गेले चार-पाच दिवस प्लाझ्मा संकलन किटचा तुटवडा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये साधारण चार बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून प्लाझ्मा संकलक किटचे वितरण होते. यापैकी दोन कंपन्यांनी किट पुरविण्यास असमर्थता दर्शवली. मागणी वाढल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आणि प्लाझ्मादान बंद ठेवावे लागले. परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे रक्तपेढ्यांकडून सांगण्यात आले.
गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे. सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये प्लाझ्मा दाते शोधण्यात आणि जनजागृती करण्यात अनेक मर्यादा येत होत्या. गेल्या दोन महिन्यांत हे चित्र काहीसे बदलताना दिसत आहे. कोरोनामुक्त झालेले अनेक रुग्ण आपण होऊन पुढे येत आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये आधार ब्लड बँक, पीएसआय, संजीवनी ब्लड बँक अशा शहरातील बऱ्याच रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा किटचा तुटवडा निर्माण झाला. दिवसाला पंधरा प्लाझ्मा किट लागत असतील, तर रक्तपेढ्याकडे चार ते पाच किट उपलब्ध असल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी प्लाझ्मा दात्यांना दोन ते तीन दिवसांनी येण्यास सांगण्यात आले, तर रुग्णांच्या नातेवाइकांनाही प्लाझ्मासाठी धावपळ करावी लागली.
------
फेरेसिस सेल सेपरेटर मशीनमध्ये किटमधील प्लाझ्मा वेगळा केला जातो. प्लाझ्मा किट उपलब्ध नसेल तर मशीन निरुपयोगी ठरते. एका प्लाझ्मा किटची किंमत साधारण ८००० रुपये असते. एका दात्याकडून एका वेळी दोन डोस इतका प्लाझ्मा संकलित करता येतो. एक डोस 200 एमएल इतका असतो. एका प्लाझ्मा बॅगची किंमत राज्य शासनाने साडेपाच हजार रुपये इतकी ठरवून दिलेली आहे. सध्या तरी भारतात प्लाझ्मा किटचे उत्पादन होत नाही. चार ते पाच बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून किट मागवल्या जातात. या कंपन्यांचे पाच ते सहा वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पादन प्रकल्प असतात. त्यानुसार नियोजन करून विविध देशांना किटचे वितरण केले जाते. सध्या एका रक्तपेढीमध्ये सरासरी ५ ते १० दात्यांकडून प्लाझ्मा संकलित केला जात आहे.
- अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी
----
गेले चार दिवस पुण्यातील बऱ्याच रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा किट उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे प्लाझ्मादान थांबले होते आणि रुग्णांची अडचण झाली होती. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याने मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. केवळ कोरोना रुग्णांमध्येच नव्हे तर इतर अनेक आजारांमध्ये प्लाझ्माचा वापर केला जातो. शासनाने ज्याप्रमाणे रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावर नियंत्रण आणले, त्याचप्रमाणे शासनाने प्लाझ्मा थेरपीसाठीही मदतीचा हात पुढे करावा.
- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट
----
दर दिवशी रक्तपेढीमध्ये साधारण दहा ते पंधरा प्लाझ्मा किट लागतात. कंपनीकडून वितरण न झाल्याने तीन-चार दिवस किटचा तुटवडा निर्माण झाला होता. रक्तपेढीला पुरवठा होत असलेली कंपनी अमेरिकेतील असून त्यांचे डेन्मार्क, स्विझर्लंड असे विविध ठिकाणी प्रकल्प आहेत. भारतातील त्यांचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे. विविध देशांमधून प्लाझ्मा थेरपीची मागणी वाढल्याने किट मिळण्यास काहीसा उशीर होत होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
- संजय चौधरी, पीएसआय ब्लड सेंटर, रास्ता पेठ