पुणे : सोहम ट्रस्ट संस्थेच्या वतीने डॉक्टर फॉर बेगर्स या प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकऱ्यामार्फत रक्तदान उपक्रम सुरू केला आहे. या रक्तदानातून आतापर्यंत ५१ रुग्णांचे प्राण वाचले आहेत. सोहम संस्थेचे डॉ अभिजित सोनवणे यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ मनिषा सोनवणे उपस्थित होत्या.
सध्याच्या कोरोना साथीच्या रोगामध्ये रक्ताची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात दिसून येत आहे. त्याअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. रक्ताची कमतरता भासू लागल्याने संस्थेने धडधाकट भिक्षेकऱ्यांमार्फत हा उपक्रम सुरू केला आहे.
अभिजित सोनवणे म्हणाले, आम्ही मागील पाच वर्षांपासून रस्त्यावरील भिक्षेकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवत आहोत. तर काहींना छोटे व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत आहोत. आतापर्यंत ८५ कुटुंबांना छोटे व्यवसाय उघडून दिले आहेत. त्यामधील ३५० भिक्षेकरी रक्तदानास तयार झाले आहेत. तर १७ लोकांनी रक्तदान केले आहे. जनकल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्याने भिक्षेकऱ्याची तपासणी केली जाते. भिक्षेकरी रक्तदान करण्यास पात्र ठरल्यास रक्त घेतले जाते.