लोकमत न्यूज नेटवर्क
सोमेश्वरनगर : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, ते आताच्या परिस्थितीत खूप गरजेचे आहे. तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, या भावनेने मिळालेले समाधान सर्वांत मोठे आहे. त्यातून तुम्ही निभावलेले माणूसपणाचे नाते दिसून येते, असे मत बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी व्यक्त केले.
कोविडसारख्या भयंकर संकटात रक्ताची कमतरता भासत असल्याने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजेपूल पोलीस चौकीसमोर रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे, वडगावचे सपोनि सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्यासह सर्व पोलीस स्टाफ व परिसरातील पदाधिकारी व युवक कार्यकर्ते हजर होते.
प्रास्ताविक वडगाव निंबाळकरचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी केले. डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी सोमेश्वरनगर परिसरात सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर होते, असे सांगून सर्व नागरिकांचे कौतुक केले. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.
सूत्रसंचालन ॲड. गणेश आळंदीकर यांनी केले. आभार पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी मानले. अक्षय ब्लड बँक हडपसरचे डॉ. सुजित शिंदे, रूपेश दरेकर, अविनाश जोशी, शुभ गवळी, चंद्रसेन कळके, विकास पाटील, विजय भोसले यांनी रक्तगट तपासणी व इतर तपासण्या केल्या. सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सतीश सकुंडे, सभापती नीता फरांदे, राजवर्धन शिंदे, अभिजित काकडे, किरण आळंदीकर, कौस्तुभ चव्हाण, ॲड. नवनाथ भोसले, बुवासाहेब हुंबरे, धनंजय गडदरे आदींची उपस्थिती होती.