पुणे : बकरी ईदला रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करुयात असा संदेश देत पुण्यातील मुस्लिम सत्यशाेधक मंडळातर्फे रक्तदान शिबीराचे आयाेजन करण्यात आले हाेते. पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा सांगली- काेल्हापूर येथील पूरातील जखमींना या रक्तदानाच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे.
बकरी ईद आज देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम सत्यशाेधक मंडळाकडून बकरी ईद निमित्त कुरबानी न देता रक्तदान करण्याचा संदेश देण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येताे. या उपक्रमात यंदा 50 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. रक्तदानापेक्षा कुठलेही श्रेष्ठ दान नाही. ईद निमित्त रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान केल्याने दुवा मिळतील असेच या उपक्रमातून सांगण्यात आले.
यावेळी बाेलताना मुस्लिम सत्यशाेधक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमशुद्दीन तांबाेळी म्हणाले, आम्ही गेल्या आठ वर्षापासून बकरी ईद हा सण रक्तदान सप्ताह म्हणून आम्ही साजरा करताे. प्राण्यांची आहुती देऊन त्यांचे रक्त सांडण्यापेक्षा माणसाला उपयाेगी पडणारं, जात आणि घर्माच्यापलीकडे जात मानुसकीचं नातं जाेपसणारं रक्त सर्वांसाठी आवश्यक आहे. पारंपारिक सण समाजाभिमुख व्हायला हवेत, मानवतावादी व्हायला हवे, यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. यंदाच्या पूरामुळे काेल्हापूर, सांगली भागात माेठी जीवीत हानी झाली आहे. तसेच तिथे रक्ताची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे रक्तसंकलन करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम सत्यशाेधक मंडळाकडून 51 हजार रुपये सुद्धा पूरग्रस्तांना देण्यात आले आहेत. हा उपक्रम धर्माच्या चिकित्सेचा नाही तर धर्माच्या उन्नयनाचा भाग आहे. आजच्या काळात माणसासाठी माणसाने जगणं हा या मागील संदेश आहे.