पुणे : लोकमत आणि शहर पोलीस दलाच्या वतीने शिवाजीनगर येथील पोलीस हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान अभियान आयोजिले आहे. यामध्ये पोलीस बांधवांनाही रक्तदान करून समाजकार्याला हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.
शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिबिर होईल. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या (एसबीटीसी) सहकार्याने शिबिर होत आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, ‘लोकमत’च्या वतीने महारक्तदान मोहीम एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे. कोरोनाच्या या काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. या उपक्रमामध्ये शहर पोलीस बांधवही सहभागी होणार असून, त्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान करावे, असे माझे सर्वांना आवाहन आहे.