सुहास बाणखेले म्हणाले की, लोकमतने नेहमीच सामाजिक जाणिवेतून विधायक उपक्रम राबवले आहेत. महाराष्ट्रभर राबवण्यात येणारा रक्तदान महायज्ञ हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाचा मुकाबला सर्वजण करत आहेत. या काळात रक्ताची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासली. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करणे महत्त्वाचे होते व ते काम लोकमतने केले आहे. आंबेगाव तालुका हा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. रक्तदानामध्ये तालुक्याने एक वेगळाच विक्रम केला आहे. खऱ्या अर्थाने धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांनी १३ वर्षांपूर्वी रक्तदान चळवळीला सुरुवात केली. दुर्दैवाने अण्णांचे निधन झाले. त्यांच्या विचाराला स्मरून त्यांचे हे कार्य पुढे नेण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत. अण्णांनी घालून दिलेला आदर्श जोपासत रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत.
तालुक्यात दरवर्षी न चुकता रक्तदान करणारे अनेकजण आहेत त्यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे.आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो हे लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले जाते. आतापर्यंत सुमारे वीस हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले असून हा एक प्रकारचा विक्रमच आहे. लोकमतच्या साथीने यावर्षी विक्रमात भर घालण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. एकाच दिवशी सात रक्तदान केंद्रावर एक हजार पिशवी रक्त संकलित करण्याचा मनोदय सुहास बाणखेले यांनी व्यक्त केला आहे.
धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय मंचर, प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा, डॉ. घाडगे हॉस्पिटल रांजणी, प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर, अस्मिता भवन आदर्शगाव कुरवंडी, हनुमान मंदिर एस.टी. स्टँड शेजारी टाकळी हाजी, डॉ. पोखरकर यांचे श्रीराम क्लिनिक ग्रामपंचायत गाळे पिंपरखेड येथे होणार आहे. आतापर्यंत चार ते पाच हजार रक्तदात्यांना गरज पडल्याने मोफत रक्त दिले आहे. नागरिकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन बाणखेले यांनी केले आहे.
१८ मंचर बाणखेले