रक्तदानाबद्दल अद्याप नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. रक्तदान कुणी करावे, कुणी करू नये याविषयीची माहिती रक्तदात्याने घेणे जरुरीचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या युगात सर्वांनाच वेळेची कमतरता असताना रक्तदानाचे गांभीर्य टिकून आहे. ही निश्चितच समाधानाची बाब आहे. शहर, ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणात रक्तदान होत असून, गरजू व्यक्तींना रक्तपुरवठा केला जात असल्याची माहिती डॉ. जगन्नाथ महाजन यांनी दिली. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...रक्तदाता दिवस म्हणजे रक्ताविषयक आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. जागतिक पातळीवर त्याची ठळकपणे नोंद घेतली जाते. भारतातदेखील आता रक्तदानाबद्दल विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. रक्तदान करतात. ज्या रक्तपेढ्यांना रक्ताची गरज आहे, त्यांना मुबलक प्रमाणात रक्ताचा पुरवठा होतो. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपेढ्या असून, रक्तदानाकरिता रक्तदात्यांचा प्रतिसाद लक्षणीय आहे. खास करून युवावर्गात रक्तदानाबद्दल होणारा प्रचार आणि प्रसार महत्त्वाचा आहे.सध्या सोशल माध्यमांद्वारे कुणाला तातडीने रक्ताची गरज आहे, कुठल्या रक्तपेढीकडे आवश्यक त्या रक्तगटाचे रक्त उपलब्ध आहे याची माहिती त्वरित मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचतात. रक्तदाता आणि रक्तदान याविषयी सांगायचे झाल्यास ज्याचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशी व्यक्ती रक्तदान करू शकते. वयाच्या ५८ वर्षापर्यंत व्यक्ती रक्तदान करू शकतात. रक्तदानापूर्वी किमान चार तास नाश्ता अथवा जेवण केलेले असावे. रक्तदात्याचे वजन किमान ४५ ते ५0 किलोपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. पुरु ष रक्तदाता दर तीन महिन्यानंतर व स्त्री रक्तदाता ४ महिन्यांनंतर रक्तदान करू शकतात. रक्तदात्याने हा फरक लक्षात घ्यावा. अनेकदा सातत्याने रक्तदान केल्याने संबंधित व्यक्तीला अशक्तपणाला सामोरे जावे लागते. आपल्या शरीरातील ५ ते ६ लीटर रक्तसाठ्यातून ३५0 मिली रक्तदान केल्याने रक्तदात्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. याउलट रक्तदान केल्याने आपल्या हाडांच्या मगजांना चालना मिळते. ज्यामुळे नवीन रक्त आपल्या शरीरात तयार होऊन तब्येत सुदृढ राहण्यास मदत होते.याप्रकारे रक्तदानाचा फायदा होतो. एकदा रक्तदान केल्याने ३ ते ४ रुग्णांचे प्राण वाचू शकतात, हे नक्कीच पुण्यकर्म आहे. ज्या व्यक्तीला जर सातत्याने जुलाब आणि वजनात घट असल्यास त्या व्यक्तीने रक्तदान करू नये. याबरोबरच मधुमेह, दमा, कावीळ, हदयरोग, कॅन्सर असे विकार असलेल्या व्यक्तीने देखील रक्तदान करणे टाळावे. रक्तदानासाठी पुरुषांबरोबर स्त्रियांनी देखील स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घेणे गरजेचे आहे. रक्तदात्यांना रक्तदानाविषयी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्यास, ज्या व्यक्तीचा रक्तगट हा निगेटिव्ह आहे, अशा व्यक्तीने आपले नाव रक्तपेढीमध्ये नोंदवणे आवश्यक आहे.सर्वसामान्य व्यक्तीने रक्तदानाबाबत माहिती घ्यायला हवी. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला आॅक्सिजनची गरज असते. तो पुरविण्याची ताकद हिमोग्लोबिनमध्ये असते. ते प्रमाण १२.५ प्रतिग्रॅम डेसी लीटरपेक्षा जास्त असावे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाणकमी असते. ज्यांच्यात हे प्रमाणकमी आहे अशांनी नेहमी गूळ, गाजर, खजूर, नाचणी, हिरव्या पालेभाज्या, खाव्यात तसेच लोखंडी भांड्यातूनअन्न शिजवून खाणे गरजेचे आहे. आपली उंची सेंटीमीटरमध्येमोजून त्यातून १00 जमा केल्यास आपले वजन समजते. त्यानुसार आपल्या वजनाची उंचीची रक्तगटाची हिमोग्लोबिनचे प्रमाण याची नोंद जवळ ठेवावी.आजारी व्यक्तीने रक्तदान करू नये, कायमस्वरूपी औषधोपचार चालू असल्यास छोटे किंवा मोठ्या स्वरूपाचे आॅपरेशन झाले असल्यास रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याने लक्षात घ्याव्यात. आपल्या रक्तदानामुळे जर कुणाचा जीव वाचणार असेल तर यातून माणुसकी जपली जाणार आहे, याचा विचार रक्तदात्याने करावा.
रक्तदानातून माणुसकीचा बंध जपला जातो - डॉ. जगन्नाथ महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 2:35 AM