लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आलेली असतानाच रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये सध्या पुढील चार-पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. मिनी लॉकडाऊन, कोरोनाच्या भीतीने कमी झालेले रक्तदान शिबिरांचे प्रमाण, लसीकरण यामुळे रक्त संकलनाचे प्रमाणही कमी झाले आहे. रक्तपेढ्यांकडून गृहनिर्माण सोसायट्यांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले जात आहे.
रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. स्नेहल मुजूमदार म्हणाल्या, रक्तदानाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. रुबी हॉलमध्ये प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात, कर्करोगाचे उपचार होतात. त्यासाठी रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात लागतो. फेरेसिस मशिनच्या सहाय्याने रक्तातील घटक वेगवेगळे केले जातात. प्लेटलेटचे शेल्फ लाइफ कमी असते, प्लाझ्मा वर्षभर साठवून ठेवता येतो. मात्र, सध्या प्लाझ्मा अजिबातच शिल्लक नाही. वर्षभर आयटी कंपन्या, महाविद्यालये अशा ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात आणि चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या आयटी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शिबिरेही बंद आहेत.
सध्या पुणे शहरामध्ये १५ खासगी रक्तपेढ्या आहेत तर ससून ही एकमेव शासकीय रक्तपेढी आहे. सध्या सर्वत्र प्लाझ्मा शिल्लक नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लसीकरण सुरू झाले असताना रक्ताचा तुटवडाही निर्माण झाला आहे.
--
उन्हाळयामध्ये नेहमीच रक्ताचा तुटवडा निर्माण होतो त्याचबरोबर मागील वर्षी आणि या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सामाजिक अंतर, मास्क, बेड सॅनिटेशन करून सर्व काळजी घेऊन शिबिर आयोजित करत आहोत. सर्व नागरिकांना आवाहन आहे की सर्वांनी छोट्या छोट्या पातळीवर कॅम्प आयोजित करावे. विविध मंडळे, सोसायट्या, ऑफिसेसमध्ये शिबिर आयोजित करावी. लस घेण्याअगोदर प्रत्येकाने रक्तदान करावे. व्होल्व्हो व्हॅनमध्येही आपण शिबिर आयोजित करू शकतो.
- डॉ. नलिनी कडगी, ससून रक्तपेढी
-----
सध्या रक्तपेढीमध्ये ४००-५०० युनिट इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. दररोज साधारणपणे ८० युनिट रक्तसाठ्याची गरज भासते. सध्या कोरोना रुग्णांप्रमाणे नॉन-कोविड रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. कोरोनाची भीती, लॉकडाऊन यामुळे रक्तसंकलनही कमी झाले आहे. पुढील आठवड्यापासून तुटवड्याच्या झळा जाणवू लागतील. पुण्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण राबवले जात आहे, ही चांगलीच बाब आहे. मात्र, त्यामुळे पुढील अडीच-तीन महिने रक्तदात्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होणार आहे. त्यामुळे लसीकरणाआधी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लसीकरण करावे. सामाजिक संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांना आम्ही लहान स्वरूपाची रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करत आहोत.
- अतुल कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढी
--
ससूनमधील शिल्लक साठा (४ एप्रिल)
रक्तपेशी - १२४ युनिट्स
प्लाझ्मा - ७४६ युनिट्स
प्लेटलेट्स - ८१ युनिट्स
--
ससूनमध्ये दररोज लागणारा साठा :
रक्तपेशी : ३०-४० युनिट्स
प्लाझ्मा : ३०-४० युनिट्स
प्लेटलेट्स : २०-४० युनिट्स