जेजुरी : जेजुरी रेल्वेस्टेशन नजीक साईमंदिरालगत मंगळवारी (दि.१८) झालेल्या हरिष योगेश्वर निमजे (वय ३२) या तरुणाच्या खुनाचे गूढ पोलिसांनी उकलले असून या घटनेतील आरोपी शेखर ऊर्फ चिम्या वसंत माने (रा. रेल्वेस्टेशन जेजुरी) यास चंदननगर, पुणे येथून सापळा लावून पकडले.त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेखर माने याच्यावर भा.दं.वि.कलम ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून सासवड येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमित दिंडे यांच्यासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, मयत हरिष निमजे हा गेली ६ ते ७ वर्षांपासून जेजुरीत वास्तव्यास असून तो शेखर वसंत माने यांचेकडे काम करतो. तसेच त्याचे आणि माने परिवाराचे मित्रत्वाचे आणि सलोख्याचे नाते होते. माने यांच्या घरी तो रोजजेवणखान करण्याकरिता जात असे. त्याचेकडून शेखर माने याने ३५०० रुपये उसनवारीने घेतले होते. परंतु आर्थिक अडचण असल्याने शेखर माने वेळेत पैसे परत देवू शकला नव्हता तर हरिष पैसे मागताना वाद घालून भांडण तंटा व शिवीगाळ करीत होता. मंगळवारी (दि.१८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हरिष याने शेखर मानेच्या घरी जावून पैशाची मागणी केली; परंतु शेखरकडे पैसे नसल्याने दोघांमध्ये वाद झाला.यावेळी घरासमोर पडलेला कोयता उचलून शेखरने हरिष निमजेच्या मानेवर वार केला. एकाच वाराने हरिष खाली पडलेला पाहून शेखर मानेने तेथून स्वत:च्या दुचाकीवरून पलायन केले. नाझरे जलाशयात हत्या करताना वापरलेला कोयता टाकून दिल्याचे आरोपी शेखर माने याने चौकशीचे वेळी पोलिसांना सांगीतले आहे. जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
पैशाच्या वादातूनच तरुणाचा खून
By admin | Published: April 21, 2017 6:02 AM