खडकी : शतपावली करण्याकरिता गेलेल्या तरुणाला ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने पाठलाग करून धारदार शस्त्राने पाठीवर, मानेवर, कानावर व उजव्या हातावर सपासप वार करून पोबारा केला़ या हल्ल्यामध्ये तरुण जबर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. योगिराज खंडाळे (वय २३, रा. खडकी बाजार) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सिराज कुरेशी (वय ४०) राहणार सुरती मोहोल्ला खडकी बाजार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कलम ३०२, १४३, ४४, ४८, ४९, ३७/१ सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला असून, त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.याबाबत खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार प्रकाश अवचिते (वय ३०, रा़ खराडी पुणे) हे ३१ मार्च रोजी त्यांचे मामा शिवराज खंडाळे यांच्या घरी आले होते़ रात्री जेवण केल्यानंतर ओमकार यांचा मामाचा मुलगा योगिराज व त्याचे इतर चार पाच मित्र शतपावली करण्याकरिता खडकी बोर्डाच्या कचरा हस्तांतरण डेपोजवळून जात असताना योगिराज हा मोबाईलवर गेम खेळत असताना त्यांच्या समोरून अचानकपणे आकाश चांदणे, सिराज कुरेशी व त्याचा मुलगा शाहीद कुरेशी व इतर सात आठ जण हातात तलवारी, चॉपर व धारदार शस्त्रे घेऊन आरडा ओरडा करीत त्यांच्या दिशेने पळत येत होती. योगिराज हा रस्त्यावरून पळत होता़, ते सर्व जण त्याचा पाठलाग करीत होते, त्यानंतर ओंकार व योगिराजचे मित्र काही वेळानंतर भिंतीवरून उडी मारून रस्त्यावर गेले असता योगिराज हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला़ संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी योगिराज यास मृत घोषित केले. खडकी पोलीस ठाण्यात योगिराजचा मृतदेह नेऊन जोपर्यंत आरोपी धरले जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला़(वार्ताहर)
खडकीमध्ये तरुणाचा निर्घृण खून
By admin | Published: April 02, 2017 2:53 AM