लक्ष्मण मोरे
पुणे : तारुण्याच्या ऐन भरात विवाह झाल्यानंतर वार्धक्य येईपर्यंत माणूस संसार फुलवित राहतो. परंतु, आयुष्यभराचा जोडीदार मध्येच साथ सोडून गेल्यानंतर कोलमडून पडायला होते. एकटेपणाची भावना जीवावर उठते. जेवणाखाण्यापासून ते औषधांपर्यंतचे हाल होऊ लागतात. अशा काळात पुन्हा सोबत चालणा-या पावलांची आवश्यकता भासू लागते. सप्तपदी न चालताही ‘लिव्ह-इन-रिलेशीप’मधून शेकडो ज्येष्ठांचे प्रेम पुन्हा बहरास आले आहे. एकमेकांना समजून घेत एकमेकांची काळजी घेत या जोडप्यांच्या आयुष्याची सांज पुन्हा सुरम्य झाली आहे.
'लिव्ह इन' कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अद्यापही बदलेलेला नाही. ज्येष्ठांचे वयोमान साधारणपणे ८० ते ९० च्या दरम्यान आलेले आहे. त्यामुळे खूप मोठा काळ त्यांना एकट्याने कंठावा लागतो. खºया अर्थाने त्यांनाही जोडीदाराची आवश्यकता असते. परंतु, ही काळाची गरज असल्याचे या ज्येष्ठांचे म्हणणे आहे. आमचे आयुष्य एकाकी होण्यापेक्षा सुकर झाले हे काय कमी आहे असे एक आजी म्हणाल्या. जोडीदाराचे निधन झाले अथवा घटस्फोट झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटे पडतात.
सुख-दु:खात, संघर्षात, यशापशात साथ देणारा जोडीदार मध्यातूनच सोडून गेल्यामुळे आयुष्य खडतर होते. मुलांचे होणारे दुर्लक्ष आणि एकटेपणाची भावना या ज्येष्ठांना मानसिक यातना देत राहते. त्यांच्या या समस्येवर ‘लिव्ह इन’चा उतारा लागू पडला आहे. कोणी डॉक्टर आहे तर, कोणी व्यावसायिक, कोणी प्राध्यापक आहे तर कोणी गृहीणी, कोणी राजकारणी आहे तर कोणी निवृत्त सरकारी अधिकारी. भिन्न विचार-आचार असले तरी केवळ प्रेमाच्या आणि आपुलकीच्या शोधात असलेले ज्येष्ठ एकत्र नांदत आहेत. सामाजिकदृष्ट्या ते विवाहीत नसले तरी त्यांची अंतर्मने जुळलेली आहेत. एकमेकांच्या काळजातलं दु:ख, डोळ्यातली वेदना, दुखणं-खुपणं, आनंद त्यांना समजतो. एकाला वेदना झाली तर दुसरा कळवळतो एवढे उत्तम ‘बॉंडिंग’ या ज्येष्ठांमध्ये लिव्ह-इनमधून तयार झाले आहे.===सकारात्मक बाजू- दोघांच्या राजीखुशीने करारनामा करणे- काही काळ एकत्र व्यतित केल्यावर दोघांची इच्छा असल्यास लग्नही- जो-तो आपापला आर्थिक भार उचलतो. संपत्तीला कोणताही धोका नाही. (त्यामुळे मुलांकडून सकारात्मक प्रतिसाद)- जेवणाची व औषधांची पथ्ये पाळली जातात.- योग्य जोडीदार मिळाल्यास दोघेही एकमेकांची काळजी घेतात.- संवाद साधायला, मोकळं व्हायला हक्काचं माणूस मिळतं.=====मी सांगलीचा माजी महापौर आहे. मी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होतो. माझी पत्नीही तेथेच प्राध्यापक होती. वैयक्तिक मतभेदांमुळे आमचा घटस्फोट झाला. मी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतो. मला आयुष्याचा एक जोडीदार हवा असल्याने माधव दामलेंकडे नाव नोंदविले होते. तेथे माझी ओळख साधना सोबत झाली. तिच्या पतींचे निधन झालेले होते. मागील वर्षी ‘व्हॅलंटाईन डे’च्या दिवशीच मी त्यांना गुलाब देऊन प्रेमाची गळ घातली. त्यांनीही त्याला होकार दिला. आता त्या माझ्या सामाजिक कार्यात हातभार लावत आहेत.- डॉ. नितीन सावगावे, सांगली=====माझा इलेक्ट्रिक कन्स्लटिंगचा व्यवसाय आहे. पत्नीच्या निधनानंतर मी एकटा पडलो होतो. त्यामुळे संस्थेत नाव नोंदविले. आसावरी कुलकर्णी यांच्याशी ओळख झाल्यावर आम्ही दोघे एकत्र राहू लागलो. आम्ही दोघेही ७० वर्षाचे आहोत. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आणि आदर आहे. आम्ही दोघेही कोरोना पॉझिटीव्ह होतो. आताही दहा बारा दिवस मी रुग्णालयात होतो. पण, हिने माझी सर्व शुश्रृषा केली. डबा देण्यापासून उपचारांपर्यंत सर्व काळजी घेतली. आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत. आमच्या दोघांच्याही मुलांनी आम्हाला कायमच पूर्ण पाठिंबा दिलेला आहे.- अनिल यार्दी, बिबवेवाडी=====‘ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळ’ संस्थेमधून आजवर शेकडो ज्येष्ठांना आपला प्रेमाचा जोडीदार मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ बाबत निर्णय दिला. त्यानंतर ज्येष्ठांसाठी हा उत्तम पर्याय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत जागरुकता सुरु केल्यावर ज्येष्ठांनी सकारात्मक प्रतिसाद देत एक त्र येण्यास सुरुवात केली. या प्रयत्नांमधून अनेक जोडपी एकत्र ‘नांदत’ आहेत.- माधव दामले, संस्थाप्रमुख.