पुणे : गोरा साहेब आणि मूठभर श्रीमंताच्या मुंबई-पुणे प्रवासासाठी तब्बल ८६ वर्षांपूवी म्हणजेच १ जून १९३0 रोजी सुरू करण्यात आलेली ‘ब्लू बर्ड बेबी’ अर्थात डेक्कन क्विन बुधवारी (दि. १) ८७व्या वर्षात पदार्पण करत आहे. अवघे ८६ वर्षे वय झालेली ही महाराणी आजही इमानेइतबारे कोणत्याही आदराची अपेक्षा न ठेवता आपली सेवा बजावत असून, या कालावधीत कोट्यवधी प्रवाशांना ने-आण केलेली आहे. या महाराणीचा वाढदिवस रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने पुणे रेल्वे स्थानकावर साजरा केला जाणार असून, या निमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने या गाडीच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात येणार असल्याची माहिती ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन ब्रिटिश सरकारने मुंबई-पुणे प्रवासासाठी ही गाडी सुरू केली. त्यानंतर १९४३ पर्यंत केवळ अधिकारी आणि श्रीमंतानाच या गाडीने प्रवास करता येत होता. १९४३ नंतर सर्वांसाठी ही गाडी खुली करण्यात आली. त्यानंतर आजतागायात शेकडो प्रवाशांनी या गाडीने पुणे-मुंबई प्रवास केला आहे. पुढे ही चाकरमान्यांची गाडी म्हणून ओळखली जाऊन तिला ‘डेक्कन क्वीन’ हे नाव देण्यात आले. या ८६ वर्षांच्या कालावधीत या गाडीला केवळ १ अपघात झाला. २७ क्रमांकाच्या बोगद्याजवळ १३ जुलै १९९१ रोजी या गाडीचे ९ डबे घसरले होते. त्या वेळी तब्बल ९ दिवस ही गाडी बंद होती. त्यानंतर ३0 नोव्हेंबर २00६ मध्ये एका आंदोलनात या गाडीचे ६ डबे पेटविण्यात आले होते. चाकरमान्याची कधीही या गाडीने साथ सोडलेली नसून, ८६ वर्षांपासून ही गाडी आपली सेवा बजावत आहे.
ब्लू बर्ड बेबी ‘डेक्कन क्वीन’ झाली ८६ वर्षांची
By admin | Published: June 01, 2016 1:02 AM