लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमानजीक पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी शुक्रवारी २०३ वा विजयदिनी राज्यभरातून हजारो अनुयायी आले होते. दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने पुष्पचक्र वाहून सामाजिक अंतराचे पालन करत विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेमुळे गर्दी न होता स्तंभाचे दर्शन घेता आले.
पेरणे फाटा (ता. हवेली) येथील नियोजित कार्यक्रमास गुरुवारपासूनच सुरवात झाली. शुक्रवारी सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. प्रमुख मान्यवरात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, दलित कोब्राचे अॅड. भाई विवेक चव्हाण, बहुजन समाज पार्टी, भीमा कोरेगाव विजयरणस्तंभ सेवा संघाचे सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, सरपंच रूपेश ठोंबरे, उपसरपंच किरण भंडलकर आदींसह विविध संस्था व पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे, गौतम चाबुकस्वार, प्रकाश गजभिये तसेच बार्टीसह अनेक संस्थांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेट देवून मानवंदना दिली. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा संघ व पेरणे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अनुयायांना सॅनिटायझर, मास्क वाटप तसेच सामाजिक अंतराचे पालन करत मानवंदना देण्यासाठी सहकार्य करण्यात येत होते. यासाठी पुणे-नगर रस्त्यावर चारही बाजूंनी येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती. यामुळे पोलिसांना गर्दीचे नियोजन करणे सोपे झाले.
चौकट
दुपारनंतर वाढली गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पास व्यवस्था केली होती. पास असणाऱ्यांनाच मानवंदना देता येईल, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही दुपारनंतर येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढत गेली. यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला होता. पोलीस प्रशासनाने राजमुद्रा ग्रुपच्या बसेसच्या माध्यमातून अनुयायांची येण्याजाण्याची व्यवस्था केली होती. दुपारनंतर मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांच्या गर्दीमुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला होता. पोलीस यंत्रणेने वेळीच प्रयत्न केल्याने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवता आले.
.........
तिहेरी व्यवस्थेमुळे टळली गैरसोय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने स्तंभस्थळी केलेली अंतर्गत अभिवादन व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्याच्या तिहेरी व्यवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय झाली नाही. गैरप्रकार टाळण्यासाठी जागोजागी पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
फोटोओळी : पेरणे फाटा (ता. हवेली) : कोरेगाव लढाईच्या येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून आलेले अनुयायी.