महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयापुढील सर्वांना लसीकरण केले जाणार आहे. यातून शहरातील जवळपास २३ टक्के नागरिकांना म्हणजेच सुमारे १६ लाख जणांचे लसीकरण होऊ शकेल. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.
सध्या महापालिका आणि खासगी अशा १०९ आणि ८ शासकीय रुग्णालये अशा एकूण ११७ रुग्णालयांत लसीकरण चालू आहे. आता आणखी २२३ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेने केंद्राला पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास शहरातील लसीकरण केंद्राची संख्या ३४० होईल. येत्या १ एप्रिलपासूनच ही सर्व केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, सध्या रोज बारा ते तेरा हजार पुणेकरांचे लसीकरण होत आहे. हा आकडा १८ हजारपर्यंत पोहचला होता. मात्र, लसींचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने ही संख्या पुन्हा घटली आहे.