राज्य शासनाचा वाटा नगण्य : यंदाचा खर्च ३०० कोटी अपेक्षित
लक्ष्मण मोरे
पुणे : शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून मार्च २०२१ अखेरपर्यंत कोरोना साथ नियंत्रणासाठी महापालिकेने आजवर एकूण २८६ कोटी रुपये खर्च केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा हा खर्च तीनशे कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.
गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या खर्चात सर्वाधिक खर्च आरोग्य विभागावर झाला आहे. त्याखालोखाल जम्बो कोविड सेंटरचा खर्च जास्त आहे. कोरोनावरील खर्चात राज्य शासनाचा वाटा नगण्य असल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाकडून आजवर अवघे तीन कोटी रुपयेच पालिकेच्या हातावर टेकविण्यात आले आहेत. यासोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसेही शासनाने दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोनाची साथ आल्यानंतर कोविड सेंटरची उभारणी, रुग्णालयांमध्ये खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उभारणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, रुग्णवाहिका, मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट आदी वस्तूंची खरेदी यावर खर्च झाला आहे. यासोबतच, पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह विविध वैद्यकीय योजनांवरही कोट्यवधींचा खर्च झाला. सर्वाधिक खर्च हा औषधोपचार आणि ‘जम्बो’सह अन्य रुग्णालयांच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर’वर झाला. आवश्यकतेनुसार त्या त्या वेळची तातडीची गरज पाहून हा खर्च केल्याचे प्रशासनाने सांगितले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीवरही मोठा खर्च झाला आहे.
महापालिका प्रशासनाने यातील बहुतांश खर्च कलम ६७ (३) अंतर्गत केलेला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करीत प्रशासनाने हा खर्च केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडून कोविडवर नेमका किती खर्च झाला आहे याची माहिती प्रशासन आणि स्थायी समितीकडे मागितली जात आहे. परंतु, ही माहिती मिळत नसल्याची ओरड विरोधी पक्ष करीत आहेत.
चौकट
कोरोना काळात महापालिका प्रशासनाकडून तातडीची बाब म्हणून केलेल्या आर्थिक खर्चावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात येणार आहे. खर्चाचे सर्व प्रस्ताव मान्य करण्यासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खास सभा घेण्यात येणार आहे. या सभेत मागील वर्षी झालेल्या खर्चाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
चौकट
पालिकेचा कोविडवर २८६ कोटींचा खर्च
कोविड काळात झालेल्या खर्चाचा ढोबळ तपशील
प्रकार । खर्च
१. महसुली खर्च
(बहुतांश खर्च आरोग्य विभाग) । ११७ कोटी ७४ लाख
२. औषधे-कपडे धुलाई
ऑक्सिजन सिलिंडर खरेदी । ५३ कोटी ७४ लाख
३. जम्बो कोविड सेंटर । ४७ कोटी ७२ लाख
४. आरोग्य विभाग (भांडवली खर्च) । ७ कोटी ५४ लाख
५. वाहने-रुग्णवाहिका आदी । ८ कोटी
६. मास्क-सॅनिटायझर-पीपीई कीट । ३ कोटी ७१ लाख
७. पालिका सेवक आरोग्य सहाय्य योजना । ३ कोटी ३ लाख
८. नागरिकांची खासगी रुग्णालयांची अदा केलेली बिले । २९ कोटी ४३ लाख
९. विलगीकरण कक्ष-स्वच्छतागृह उभारणी
-जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट । ११ कोटी
१०. पालिका कर्मचारी सुरक्षा कवच विमा । ३ कोटी ७५ लाख
====
पालिकेच्या उत्पन्नाचा लेखाजोखा
वर्ष । २०२०-२१ । २०२१-२२ (यावर्षीचे अंदाज)
अंदाजपत्रक । ७ हजार ३९० कोटी । ८ हजार ३७० कोटी
उत्पन्न । ४ हजार ६७० कोटी । ५ हजार ५०० कोटी
महसुली खर्च । ३ हजार १०० कोटी । ४ हजार ३०० कोटी
भांडवली खर्च १ हजार ५७० कोटी । १ हजार २०० कोटी