लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नवीन फुलबाजाराच्या बांधकामात बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा दंड केला होता. हा दंड कृषी उत्पन्न बाजार समितीने न भरता, संचालक मंडळाकडून वसूल करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.संघटनेतर्फे बाजार समिती बाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांना देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय फुलबाजारासाठी बाजार समितीने पणन संचालकांच्या परवानगीशिवाय दोन मजले वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकामासाठी ६ हजार ३२४ ब्रास उत्खनन करण्यास परवानगी घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात ९ हजार ३९६ ब्रासचे उत्खनन केले. त्यामुळे अतिरिक्त बेकायदा उत्खननप्रकरणी जिल्हा प्रशासनाने बाजार समितीला १ कोटी ६९ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासकीय मंडळाला जबाबदार धरले आहे. प्रशासक मंडळाच्या गलथान कारभारामुळे हा दंड ठोठावला आहे. त्यामुळे हा दंड बाजार समितीकडून वसूल न करता प्रशासक मंडळाकडून वसूल करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली.
संचालक मंडळाकडून दंड वसूल करावा
By admin | Published: July 05, 2017 3:41 AM