महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १६ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, एकाच वेळी लाखो विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देत असल्याने सर्व्हरवर ताण आला. परिणामी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निकालाच पाहता आला नाही. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. मात्र,आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरू केलेले संकेतस्थळ बुधवारी सकाळपासून तांत्रिक कारणांमुळे बंद पडले. राज्यात प्रथमच अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे १ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.राज्य मंडळाने प्रसिध्द केले हेल्पलाईन क्रमांकही बंद होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला.
राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, तांत्रिक कारणामुळे सीईटी प्रवेश अर्जाचे संकेतस्थळ बंद आहे. संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळविले जाईल. तसेच सीईटी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल. त्याचप्रमाणे हेल्पलाईन क्रमांक सुरू ठेवण्याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या जातील.